जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२५ । जळगाव तालुक्यातील नशिराबादमधून अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात लोखंडी पट्टीवर झोपलेल्या तीन परप्रांतीय तरुणांना अज्ञात वाहनाने एकाच वेळी चिरडले. त्यात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.

या घटनेबाबत असं की, नशिराबाद गावाच्या पुढे असलेल्या जळगाव खुर्द नजीकच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला रोडचे काम सुरू असून त्या ठिकाणी परप्रांतीय मजूर काम करत असतात. मध्यरात्री हे परप्रांतीय मजूर झोपलेले असताना अंधारात काही न दिसल्याने अज्ञात वाहनाने तिघांना जागेवरच चिरडले आहे. सिकंदर नाटूसिंग राजपूत, भुपींदर मिथीलाल राजपूत आणि योगेश कुमार राजबहाद्दूर तिघे राहणार उत्तर प्रदेश असं मयत तरुणांचे नाव आहे.
ही घटना आज दि ११ रोजी सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. अपघात एवढा भीषण होता की तिघं मृतदेहांचा अक्षरशः चेंदामेंदा झालेला होता. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.