जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जात असून अशातच खून, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आकाश ऊर्फ खंड्या सुकलाल ठाकूर (२३), पवन ऊर्फ बद्या दिलीप बाविस्कर (२३) व आकाश ऊर्फ आक्या ब्रो रवींद्र मराठे (२२, सर्व रा. तुकारामवाडी) या तिघांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. तसे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहेत.
वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी जिल्हा पोलिस दलाच्यावतीने वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. तरीदेखील वर्तवणुकीत सुधारणा होत नसलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कडक कारवाईचा बडगा उचलला जात आहे. यामध्ये तुकारामवाडी परिसरातील आकाश ठाकूर याच्यावर सात, पवन बाविस्कर याच्याविरुद्ध सहा तर आकाश मराठेविरुद्ध खुनासह चार गंभीर गुन्हे दाखल आहेत.
त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे पाठविला होता. या तिघांच्या हद्दपारीचे आदेश पारित करण्यात आले व एमआयडीसी पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, योगेश बारी, किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश घुगे यांच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले.