जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२१ । जळगाव येथील ‘निसर्गमित्र’तर्फे वन्यजीव सप्ताहानिमित्त ऑनलाईन वन्यजीव प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत देशभरातून १ हजार २८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यातील १२८ नागरिकांनी सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली.
वन्यजीव सप्ताहानिमित्त जळगाव येथील ‘निसर्गमित्र’तर्फे २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान, वन्यजीव प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत जळगावसह धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपुर, बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, सूरत, इंदोर, बंगलोर, अहमदाबाद येथून १ हजार २८ जणांनी सहभाग घेतला होता. प्रश्नमंजुषेत एकूण १५ प्रश्न विचारण्यात आले होते. त्यापैकी वन्यजीवांचा अभ्यास करण्यासाठी जंगलाबद्दल काय जाणून घ्यायला हवे ? या प्रश्नाचे उत्तर ८७%, कोणत्या वृक्षाला ‘फ्लेम ऑफ द फॉरेस्ट’ म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर ७८% तर कोणत्या भूप्रदेशात सरपटणारे प्राणी आढळत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर ७५% लोकांनी दिले. सप्ताहाची सुरवात ‘दिल मांगे मोअर’ ही अर्थनीती सोडण्याचा मोलाचा संदेश देणार्या महात्मा गांधी यांच्या जयंतीला करण्यात आली होती. वन्यजीवनाचे संवर्धन, जतन करण्यासाठी वन्यजीवन जाणून घेण्याची गरज आहे. या दृष्टीने ही प्रश्नमंजुषा घेतल्याचे पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी संगितले.
ऑनलाईन प्रमाणपत्रांचे वाटप
कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन ही प्रश्नमंजुषा ऑनलाईन पद्धतीने आयोजित केली होती. सर्व उत्तरे बरोबर असणार्यांना ‘विशेष प्रमाणपत्र’ व अन्य सर्वांना सहभागाचे प्रमाणपत्र व्हाट्सएपद्वारे देण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे आभार गाडगीळ यांनी मानले.