⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याला अवकाळी पावसाने धुतले ; रब्बी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२४ । राज्यातील तापमानात थोडा बदल पाहायला मिळत असून अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यासह देशाच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्याला देखील पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

तालुक्यातील धोंनखेडा, कुन्हा हरदो, शेवगा, लोणवाडी, या चारही गावात गुरुवारी अचानक वादळ वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने धुतले, अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील मका, हरभरा, गहू, या पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान तालुक्यातील कुन्हा हरदो, धोंनखेडा, शेवगा, लोणवाडी या शिवारात सुमारे अर्धा तास पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले होते, तर शेकडो एकर शेतात उभे असलेले मका पीक, गहू, हरभरा, वादळ वाऱ्याने आडवे पडला. कुन्हा हरदो येथे लग्नाचा मंडपच उडाला.

यावर्षी खरीप हंगामात जून, जुलैमध्ये ढगफुटी झाली होती. त्यात ही मोठे नुकसान झाले होते. त्यातून तग धरत उभा राहण्याचा प्रयत्न करत असलेल्या शेतकऱ्याचे कंबरडे पुन्हा अवकाळीने मोडले आहे.

या भागात पावसाची शक्यता
दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज आणि उद्या कोकणात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्येही पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, अहमदनगर येथेही आज आणि उद्या हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचं आयएमडीने म्हटलं आहे. पुणे, कोल्हापूर, नाशिक, अहमदनदर, आणि छत्रपती संभाजीनगर भागात विजाच्या कडकडाटासह पावसाच्या मध्य सरी पाहायला मिळतील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.