जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२१ । पिस्तुलाचा धाक दाखवत 15 लाख रुपये असलेली बॅग हिसकावून फरार होणाऱ्या दोन चोरट्यांना बेड्या ठोकण्यात आल्यानंतर आता त्यांच्या तीसऱ्या साथीदारास देखील आज सोमवारी अटक करण्यात आली. अविनाश सुरेश माने ( वय १९, रा. दगडीचाळ, धुळे) असे अटक केलेल्या तीसऱ्या संशयिताचे नाव आहे. या तीघांकडून आत्तापर्यंत २० लाख ६१ हजार रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे.
1 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ महेश महेश चंद्रमोहन भावसार हे त्यांच्या ताब्यातील मोटार सायकलसह 15 लाख रुपये असलेली बॅग घेऊन जात होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या ताब्यातील बॅग हिसकावत पलायन केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान दोन चोरट्यांची नावे निष्पन्न झाली होती. त्या दोन चोरट्यांच्या शोधात दोन पथके तयार करण्यात आली होती. आरोपींच्या शोधात धुळे, सूरत, पुणे व उल्हासनगर आदी ठिकाणी तपास पथक रवाना करण्यात आले होते. अखेर उल्हासनगर येथे खुशाल उर्फ मनोज अशोक मोकळं व रितीक उर्फ दादु राजेंद्र राजपूत या दोघांना अटक केली होती. तेव्हापासून ते एमआयडीसी पोलिसांच्या पोलीस कोठडीत आहेत.
दरम्यानच्या काळात पोलिसांनी अधिक तपास केला असता या दोघांनी अविनाश माने याच्या मदतीने मालेगाव शहरात देखील अशाच प्रकारे गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच भावसार यांच्याकडून लांबवलेल्या पैशांपैकी काही रक्कम माने याच्याकडे ठेवल्याचेही सांगीतले. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी मालेगाव येथे जाऊन माने यालाही ताब्यात घेतले. या तीघांच्या विरुद्ध धुळे, मालेगाव व नाशिक शहरात जबरी लुट, दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच आधारावर माने यालाही अटक करुन मालेगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, या तीघांनी आत्तापर्यंत लोकांकडून लुटलेल्या रकमेपैकी २० लाख ६१ हजार रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे.
या गुन्ह्याच्या तपासकामी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक विशाल सोनवणे, उप निरीक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, पोलिस नाईक सचिन मुंडे, इमरान सैय्यद, मिलींद सोनवणे, सुधीर साळवे, संदीप पाटील, हेमंत कळसकर, सचिन पाटील यांनी तपासकामी झोकून दिल्याने तपासात यश आले.