Jalgaon : देव्हाऱ्यात पूजेसाठी ठेवलेले १५ तोळे दागिने चोरट्याने भरदिवसा लांबवीले
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२४ । जळगाव शहरात चोरट्यांनी धमाकूळ घातला असून अशातच लक्ष्मीपूजनादरम्यान देव्हाऱ्यात पूजेसाठी ठेवलेले १५ तोळे सोन्याचे दागिने व चांदीच्या काही वस्तू घर उघडे असल्याची संधी साधत चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आलीय. जळगाव शहरातील गजानन कॉलनीमध्ये ही घटना घडली असून भर दिवसा घडलेल्या या चोरीच्या घटनेने परिसरातील नागरिक धास्तावले आहेत.
अॅड. प्रताप भीमराव निकम (५९, रा. गजानन कॉलनी) यांनी लक्ष्मीपूजनानिमित्त सोने-चांदीचे दागिने देव्हाऱ्यासमोर पूजेसाठी ठेवले होते. पूजा झाल्यानंतर रात्रभर हे दागिने तेथेच होते. शनिवारी (२ नोव्हेंबर) सकाळी ८ वाजता अॅड. निकम हे घरासमोरील मंदिरात दर्शनासाठी गेले होते तर त्यांच्या पत्नी घरामध्ये कामात व्यस्त होत्या. त्यावेळी त्यांच्या घरात एक चोरटा शिरला व पूजेत ठेवलेले दागिने घेऊन तो पसार झाला.
पाच मिनिटात दागिने गायब
घरातून चोरटा दागिने घेऊन जात असल्याचे अॅड. निकम यांना दिसले. त्यावेळी ते चोर-चोर असे ओरडले व त्यांनी चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता निकम यांच्या हाताला झटका देत चोरटा घराच्या कंपाउंडमधून उडी घेत पसार झाला. घरासमोरील व्यक्तीने चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही धक्का देऊन चोरटा पसार झाला. परिसरातील सीसीटीव्हीमध्ये एक चोरटा कैद झाला आहे. याप्रकरणी त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.