जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या महिन्यात झालेल्या दोन घरफोड्यांमधील संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. यात एका विधी संघर्ष बालकाचा समावेश असून त्यांच्याकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सावित्रीनगर भागात २५ फेब्रुवारी रोजी सुरेश हिराराम सोळंकी यांच्या घरी कोणीही नसताना चोरी झाल्याचे लक्षात आले होते. त्यांच्या घराचे कुलूप तोडून 1.6 लाख रुपयांचे चांदीचे दागिने आणि 40 हजार रुपये रोख रक्कम लंपास केली.
त्यांच्या घराचे कुलूप तोडून 1.6 लाख रुपयांचे चांदीचे दागिने आणि 40 हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. 25 फेब्रुवारी रोजी शेजाऱ्यांनी घर उघडे असल्याची माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. एमआयडीसी पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत 51 सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासात, सराईत गुन्हेगार विशाल मुरलीधर दाभाडे (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) आणि त्याचा साथीदार दिपक राजू पाटील (रा. तांबापूर, जळगाव) यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
विशाल दाभाडे मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथे लपल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांचे पथक तातडीने रवाना झाले. सायबर सेलच्या मदतीने आरोपीचा शोध घेत त्याला एका लॉजमधून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि साथीदार दिपक पाटील मुक्ताईनगर येथे पळून गेल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्यालाही अटक करून 1.15 लाख रुपयांचे चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली.
विशाल दाभाडे हा जळगाव शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत 12 घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे.
अल्पवयीन मुलाने केली दुसरी घरफोडी
22 फेब्रुवारी रोजी गणेशपुरी, मेहरुण येथे मोहसीन खान अजमल खान यांच्या घरातून 23,300 रुपये चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. एमआयडीसी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मास्टर कॉलनी परिसरातील एका विधीसंघर्ष बालकाने ही चोरी केल्याचे उघड केले. त्याच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.