जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२४ । चाळीसगाव तालुक्यातील बहाळ गावातून वेगवेगळ्या वाहनांच्या बॅटऱ्या लांबविणाऱ्या चोरट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. शेख शफिक शेख सलीम (वय ३८ रा. भाभानगर धुळे) असं संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याकडून १० चोरीच्या बॅटऱ्या हस्तगत केल्या आहे. याप्रकरणी मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील राहुल विश्वास पाटील यांच्या वाहनाचे आणि परिसरातील इतरांचे वाहनातून बॅटरी चोरून नेल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी उघडकीला आली होती. यासंदर्भात मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या शोध घेत असताना मेहूणबारे पोलिसांना बॅटऱ्यांची चोरी करणारा संशयित आरोपी शेख शफिक शेख सलीम याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने सोमवारी १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शेख शफिक शेख याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने ही चोरी हमीद उर्फ नाट्या अन्सारी रा. धुळे याच्यासोबत केल्याची कबुली दिली आहे.
दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपनीच्या एकूण १० बॅटऱ्या आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. त्याच्याकडून अजून काही इतर गुन्हे उघडण्याची शक्यता आहे. शेख शफिक शेख सलीम हा परिसरातील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई मेहुणबारे पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस अधिकारी प्रवीण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, गोकुळ सोनवणे, सचिन निकम, निलेश लोहार, राकेश काळे यांनी केली आहे.