जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा पोलीसदलात बदलीचे वारे वाहू लागले असून लवकरच राज्याच्या त्यानंतर जिल्ह्याच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. जिल्हा पोलीसदलात पोलीस ठाणे, उपविभाग, तालुका, साईड ब्रांच अशा वेगवेगळ्या टप्प्यावर आणि विभागानुसार बदल्या होत असतात. जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यात आणि विभागात काही कर्मचारी वर्षानुवर्षे त्याच ठिकाणी ठाण मांडून आहेत. दरवर्षी काहीतरी कारण देत किंवा राजकीय वशिला लावून ते बदलीला स्थगिती मिळवून घेतात. एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे इतरांना त्याठिकाणी बदलून जात काम करण्याची संधी मिळत नाही. यंदा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याकडून कायम दुर्लक्षित असलेल्या पोलिसांना मोठ्या अपेक्षा असून त्या फळास येतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
जळगाव जिल्हा पोलीसदलात अधिकारी कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागले असून या महिना अखेरपर्यंत राज्यस्तरावर आणि नाशिक परिक्षेत्रातील अधिकारी वर्गाच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर जिल्ह्यातील बदली प्रक्रिया हाती घेण्यात येते. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी आतापर्यंत नेहमी कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस प्रशासनात ज्याप्रमाणे पांडे साहेबांची क्रेझ आहे तशीच क्रेझ जळगाव जिल्ह्यात पोलीस अधीक्षक डॉ.मुंढे यांची आहे. बदली प्रक्रिया हाती घेतल्यावर मुंढे साहेब योग्य तो मनासारख्या ठिकाणी बदली देतील अशी अपेक्षा अनेकांना आहे.
जळगाव जिल्हा पोलीसदलात काही कर्मचारी असे आहेत, ज्यांनी वयाची पन्नाशी ओलांडली आहे. कागदोपत्री आजाराची मोठी फाईल आहे पण आरामासाठी पोलीस मुख्यालय किंवा साईड ब्रांच नको तर क्रीम पोलीस ठाणेच त्यांना हवे असते. दरवर्षी आजाराची फाईल दाखवायची आणि शहरात किंवा तालुक्याच्या ठिकाणी पोलीस ठाण्यात पडीक राहायचे. पोलीस ठाण्यात देखील स्वस्थ बसता साहेबाची जी हुजुरी करायची आणि उमद्या कर्मचाऱ्यांना त्रास द्यायचा किंवा पुढे येऊ द्यायचे नाही असा त्यांचा फंडा असतो. पोलीसदलात नव्याने भरती झालेले आणि नवा जोश असलेले देखील अनेक कर्मचारी असून त्यांना देखील योग्य न्याय मिळाल्यास ते आपले कौशल्य दाखवू शकतात.
पोलीस अधीक्षक बदलीची यादी तपासून एक समितीसमोर सर्वांशी चर्चा करतात. कुणाला कोणते पोलीस ठाणे हवे, का हवे, बदलीला स्थगिती हवी तर का? असे काही प्रश्न विचारण्यात येतात. प्रश्नोत्तरानंतर पसंतीक्रमनुसार पोलीस ठाण्याची यादी तपासली जाते. शक्य असल्यास लागलीच होकार देण्यात येतो अन्यथा प्रतीक्षा करण्यास सांगण्यात येते. प्रतिक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मनात धाकधूक कायम असते. बदली यादी प्रसिद्ध झाल्यावर अनेकांना आनंद होतो तर अनेकांचा हिरमोड होतो. दरवर्षी काही पोलीस कर्मचारी काहीतरी करणे देऊन किंवा राजकीय वशिल्याचा उपयोग करून तेच पोलीस ठाणे कायम मिळवतात किंवा जवळचेच पोलीस ठाणे अथवा शाखा बदलून घेतात.
जळगाव जिल्ह्यात वशिलेबाज पोलिसांची मोठी फळीच असून सर्वच एका माळेचे मणी आहेत. एकाच ठिकाणी असलेल्या या स्थगितीबाज पोलिसांमुळे इतरांना त्रास तर होतोच पण आपले कौशल्य दाखविण्याची संधी देखील मिळत नाही. यंदा बदलीत पोलीस अधिक्षकांकडून अनेकांना अपेक्षा असून वय जास्त झालेले, सेवानिवृत्ती जवळ असलेले, स्थूलपणा वाढलेल्या आणि अनेकवेळा स्थगिती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक पाहिल्यावरच पुढील बदली मिळेल अशी आशा आहे. तसे पाहिले तर यादी भलीमोठी आहे पण त्यापैकी किती जणांचा पत्ता कट होतो आणि किती जणांची गाडी पुन्हा त्याच रुळावरून धावेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.