जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२२ । सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्याप्रमाणात वाढला असून सोशल मीडियावर आलेला मेसेज हा खराच असतो असे नाही, मात्र असे काही मेसेज वाचून नागरिकांमध्ये संभ्रम देखील निर्माण होत असतो. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर लोडशेडिंग सुरु झाले असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. यात कुठल्या परिसरात किती वेळ लोडशेडिंग होईल हे सुद्धा दर्शविण्यात आले आहे. मात्र याबाबत महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता हा मेसेज चुकीचा असल्याचे समोर आले आहे. जळगाव शहरात सध्या कोणत्याही प्रकारचे नियमीत लोडशेडींग सुरु नसल्याचे त्यांनी सांगितले.
आधीच उन्हाळ्याचे दिवस त्यात लोडशेडिंग म्हटले तर अंगावर काटे येण्यासारखे आहे. यंदा उन्हाळा मोठ्या प्रमाणावर असल्याचे भाकीत वर्तविण्यात आले आहे. यातच आता सोशल मीडियावर लोडशेडिंग होणार असल्याबाबतचा मेसेज फिरू लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियाचा होणारा वापर चांगला तितकाच वाईट देखील आहे. कारण सोशल मीडियावर येणारा मजकूर हा कितपत खरा असू शकतो? हा देखील मोठा प्रश्न आहे.
सध्या शहरात लोडशेडिंग होणार असल्याबाबतचा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात विविध भागातील लोडशेडिंगचा टाईम टेबल दर्शविण्यात आला आहे. सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवार अशा दिवशी सकाळी ६ ते ९ या वेळेत तर दुपारी १२.१५ ते ३.३० व मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी सकाळी ९ ते १२.१५ व दुपारी ३.३० ते ६.३० अशी वेळ या व्हायरल मेसेजमध्ये दर्शविण्यात आली आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांशी जळगाव लाईव्हच्या टीमने संपर्क साधून या व्हायरल मेसेज संदर्भात शहानिशा करीत सत्य जाणून घेतले. यावेळी सोशल मीडियावरील हा व्हायरल झालेला मेसेज चुकीचा असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. कारण सोशल मीडियावर फिरणारा हा मेसेज केवळ कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी आखण्यात आलेली रूपरेषा असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या शहरात तात्पुरत्या स्वरूपात काही कामानिमित्त किंवा लोड वाढल्यास लोडशेडिंग सुरू आहे. जर लोडशेडिंग करण्याची वेळ आली तर ती कशा पद्धतीने करण्यात यावी असा आशय संबंधित मजकूरातुन दर्शविला असून तो इमर्जन्सीसाठी आहे. मात्र सोशल मीडियावर हा मेसेज व्हायरल होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा मेसेज चुकीचा असल्याचे महावितरणचे मुख्य अभियंता रमेशकुमार पवार यांनी सांगितले.
राज्यावर वीजटंचाईचे संकट गेल्या दोन महिन्यांपासून घोंगावत असून कोळशाच्या तुटीचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सध्या तरी कोळसा उपलब्ध होत असल्याने वीज निर्मिती आणि पुरवठा देखील सुरळीतपणे सुरू आहे.