जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२१ । कोरोना काळात महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये डल्ला मारला आहे. क्वारंटाईन सेंटरच्या दोन खोल्यांमधून पलंग, पंखे, गादी, उशी असा ६५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
महावितरणचे कार्यकारी अभियंता नरेश झुरमुरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे कोरोना काळात महावितरण कंपनीच्या परिमंडळ कार्यालय परिसरातील एका इमारतीमध्ये क्वारंटाईन सेंटर तयार करण्यात आले होते. कोरोनाचा काळ संपल्यावर २ खोल्यांमध्ये प्रशिक्षणार्थी महिला त्याठिकाणी राहत होत्या.
दि.२७ जुलै रोजी प्रशिक्षण संपल्यावर दोन्ही रूमला कुलूप लावण्यात आले होते. ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.१५ वाजता सुपरवायझर सुरेश जाधव यांना दोन्ही खोल्यांचे कुलूप तुटलेले दिसले. चोरट्यांनी दोन्ही खोलीतील चार पलंग, सहा गाद्या, सहा पंखे, सात उशा, दोन ट्यूबलाइट असा ६५ हजार १४५ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार आनंदसिंग पाटील करीत आहेत.