जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२५ । जळगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ कमी होताना दिसत नसून चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. याच दरम्यान सावखेडा शिवारात मंगळवारी मध्यरात्री अंगावर चादरी टाकून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी एकापाठोपाठ एक अशा चार नामांकित शाळांची कुलपे तोडून १ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना उघडकीस आलीय. दरम्यान, ही घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली असून या चोरीत तरुण मुलीचा सहभाग दिसून येत आहे. याघटनेमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

या शाळांमध्ये चोरी
वर्धमान सीबीएससी इंग्लिश मीडियम स्कूल, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल, विवेकानंद प्रतिष्ठानचे शानबाग विद्यालय आणि गुरुकुल किड्स या शाळांमध्ये ही चोरी घडली.

वर्धमान सीबीएसई स्कूलचे प्राचार्य आशिष चंद्रकांत अजमेरा हे बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे ६.२५ वाजता शाळेत पोहोचले. त्यावेळी त्यांना मुख्य लोखंडी गेटचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी तातडीने सुरक्षारक्षक राजेंद्र चौधरी याला विचारले. मात्र त्यालाही घटनेची कल्पना नव्हती. आत जाऊन पाहिले असता अॅडमिन रूमचे आणि कपाटाचे कुलूप तोडून आतील रोख रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर परिसरातील इतर तीन शाळांत अशाप्रकारे चोरी झाल्याचं उघडकीस आले.

यात विद्यार्थ्यांची फी आणि शिष्यवृत्ती परीक्षेची रक्कम लांबविण्यात आली आहे. दरम्यान, सर्व घटनांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्यात स्कार्फ व चादर लपेटलेल्या तरुणींसह एक युवकही दिसत आहे. जळगाव शहरात याआधी ऑगस्ट महिन्यात रायसोनी नगरमध्ये अर्धनग्न चड्डी गॅंगने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता पुन्हा शहरात नवीन चादर गॅंगने धुमाकूळ घातल्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.







