जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून घरफोडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं दिसत आहे. यामुळे चोरट्यांना पोलिसांचा धाकच शिल्लक नसल्याचं दिसतेय. आता अशातच दोन दिवसांवर महाशिवरात्री आली असताना पुरातन महादेव मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.

भडगाव तालुक्यातील कजगाव येथे महादेव मंदिरातील पिंडीवरील सोन्याचा पत्रा यासह त्रिशूल व पितळी नाग घेऊन चोरटा फरार झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सकाळी भाविक दर्शन घेण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांकडून चोराचा शोध घेतला जात आहे.
याबाबत असे की, भडगावच्या कजगाव येथील वाडे रस्त्यावरील मनमाड कंपनी भागात पुरातन मनकामेश्र्वर महादेव मंदिर आहे. या मंदिरात २२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन मंदिरातील तांबे पितळाच्या सुमारे ८० हजारांच्या वस्तू चोरुन नेल्या. येत्या २६ फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. यामुळे शिव मंदिरात याची जोरदार तयारी सुरु आहे. मात्र त्यापूर्वीच या पुरातन महादेव मंदिरात चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी भाविक दर्शन घेण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला. यानंतर संपूर्ण गावात चोरी झाल्याची बातमी पसरली.
भल्या पहाटे देवळात चोरट्याने प्रवेश करत महादेवाच्या पिंडीवरील वस्तू चोरून नेल्या आहेत. महाशिवरात्री पूर्वीच या महादेवाच्या पिंडीवरील साज पितळी नाग, पिंडीवरील सोन्याचे कवच आणि त्रिशूल असा ७० ते ८० हजारांच्या विविध वस्तू चोरुन नेल्याची घटना पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली असून चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी भडगाव पोलीस करत आहेत.