जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावमध्ये घरफोडीच्या घटना सातत्यानं समोर येत असून चोरट्यांना खाकीचा धाकच नसल्याचं दिसत आहे. यातच आयकर विभाग अधीक्षकाचे बंद घर फोडून चोरट्यांनी ४८ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना जळगाव शहरातील देवेंद्रनगरात घडली. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला.

आयकर विभागात अधीक्षक असलेले मनीषकुमार सिंग (वय ३७, रा. ईस्ट रामकृष्णनगर, न्यू जगन पुरा पाटणा, बिहार) हे पत्नी व दोन मुलांसह देवेंद्रनगर, जळगाव येथे वास्तव्यास आहेत. १९ नोव्हेंबर रोजी त्यांना दिसण्यास अडचणी येत असल्याने त्याच्या उपचारासाठी ते कुटुंबासह मूळगावी गेले. त्यामुळे त्यांचे घर २० ते २६ नोव्हेंबर दरम्यान बंद होते. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटातून चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल, तीन ग्रॅमची सोन्याची अंगठी व एक ग्रॅमची अंगठी असा ४८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

सिंग यांनी घराच्या परिसरात लावलेल्या झाडांना पाणी देण्याची जबाबदारी शेजाऱ्यांवर सोपवली होती. २५ रोजी शेजारील काका पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी सिंग यांना फोन करून चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानंतर मनीषकुमार यांनी सोमवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत हे करीत आहे.

सीसीटीव्हीमध्ये चोरटे चित्रित, शोध सुरू
पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सहा दिवसांचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. त्यात २५ नोव्हेंबरच्या रात्री २ ते २.३० वाजेदरम्यान एक व्हॅगेनार कारने सिंग यांच्या घरासमोरून दोन ते तीन वेळा चकरा मारल्याचे दिसते आहे. त्या अनुषंगाने पोलिस शोध घेत आहेत. रेकी करून घरफोडी झाल्याची शक्यता आहे.







