जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२५ । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून याच दरम्यान भडगाव शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भडगाव शहरातील एका सराफा दुकानात चोरी झाली. दुकानाच्या मागील भिंतीला भगदाड पाडून चोरटे आत घुसले आणि सहा किलो चांदी आणि रोख रक्कम लंपास केला. ही घटना आज १८ मार्च रोजी सकाळी उघडकीस आल्यांनतर सराफ व्यापाऱ्यांसह परिसरात खळबळ उडाली.

या घटनेबाबत असे की, भडगावातील नामांकित घोडके ज्वेलर्स दुकानाचे मालक गेल्या दोन दिवसापासून बाहेर गावी गेल्याने ते बंद होते. बंद असलेल्या दुकानाचा फायदा घेत चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केला. आणि मोठ्या प्रमाणात चांदी व रोकड लंपास केली. चोरीची माहिती आज सकाळी उघडकीस आली.
शहराच्या मध्यवर्ती भागातच धाडसी चोरी घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेने शहरातील व्यापारी आणि नागरिक अस्वस्थ झाले असून पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.