जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२२ । आपल्याकडे काय जगभरात लग्नसोहळा अजरामर राहण्यासाठी भावी वधू-वर काहीतरी आगळेवेगळे प्रयोग करतात. लग्नाची धामधूम असो कि साधेपणा आठवणी जपण्याचा सर्वच वऱ्हाडी प्रयत्न करतात. नुकतेच उत्तराखंड राज्यातील मोडलेल्या लग्नाचा एक किस्सा चांगलाच चर्चेत आला आहे. वर किंवा सासरची मंडळी चांगली नाही, हुंड्याची मागणी होते आहे किंवा इतर मोठ्या कारणाने नाही तर अतिशय क्षुल्लक कारणावरून वधू नाराज झाली आणि मग पुढे वाद थेट पोलीस ठाण्यात पोहचला. दोन्ही पक्षांनी समजूत घातल्यावर देखील वधू ऐकण्यास तयार नसल्याने अखेर लग्नच रद्द करण्यात आले.
लग्न म्हटले कि एक वेगळेच वातावरण दोन्ही कुटुंबात सुरु होते. लग्नाच्या धामधुमीत कुणी काय करावे, काय परिधान करणार अशा अनेक गोष्टींचे नियोजन सुरु होते. लग्न अविस्मरणीय होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातात. विशेषतः लग्नात कोणतेही विघ्न येऊ नये याची काळजी घेत प्रत्येक पाऊल सांभाळून टाकले जाते आणि निर्णय देखील सर्व संमतीने घेतले जातात. मोडलेल्या एका लग्नाची गोष्ट देखील अशीच आहे. उत्तराखंड येथील हल्द्वानी येथे एका मुलीचा साखरपुडा झाला. तिचं लग्न ५ नोव्हेंबरला होणार होतं. पण नवऱ्या मुलीला नवऱ्या मुलाकडच्यांनी पाठवलेला पोशाख घागरा अगदी स्वस्तातला असल्याचं वाटलं, म्हणून ती नाराज झाली.
ऐन लग्नाच्या अगोदर वधू ची नाराजी झाल्याने दोन्ही कडील मंडळी चिंतीत झाली. मुलीच्या होणाऱ्या सासरकडच्या लोकांनी हा लहंगा (घागरा) लखनौ येथून १० हजार रुपये देऊन खरेदी केली होती. रानीखेत येथील मुलाशी या मुलीचं लग्न होणार होते. वधू नाराज झाल्याचे समजताच मुलीच्या होणाऱ्या सासऱ्यांनी तिला एटीएम कार्ड दिले आणि नवीन घागरा घेण्याचे सांगितले. तिला स्वतःच्या मर्जीचा लहंगा खरेदी करता यावा म्हणून सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण तरी मुलगी काही ऐकायला तयार नव्हती, असे वृत्त स्थानिक वृत्तसंस्थांनी दिले आहे.
वधू ऐकण्याच्या मनस्थितीतच नसल्याने संपूर्ण प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले. पोलिसांनी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. घागरा या विषयावरून सुरु झालेले प्रकरण पुढे वाढतच गेले. मुलीकडे आणि मुलाकडे दोन्हीही मंडळी वेगवेगळ्या विषयावरून भांडू लागले. पत्रिका छापल्याचं कारणही मुलाकडच्यांनी दिले तरीही कुणी ऐकायलाच तयार नव्हते. पुढे शब्दाला शब्द वाढतच गेला आणि शेवटी पोलिसांनी यावर एक अंतिम तोडगा काढला. पोलिसांनी भांडण करुन एकमेकांशी नातं जोडण्यापेक्षा ते न जोडलेलंच बरं, असा सल्ला देत लग्न रद्द करण्याचा सल्ला पोलिसांनी दोन्ही कुटुंबांना दिला. दोघांचे त्यावर एकमत झाले आणि अखेर ते लग्न रद्द करण्यात आले.
थोडक्यात काय तर कोणत्या विषयावरून काय होईल याचा आता काही भरवसा राहिलेला नाही. आजवर वरपक्षाची बाजू वरचढ असायची पण आता उलट पाहायला मिळतंय. लग्नाची धामधूम सुरु झाल्यावर वधूच्या देखील आवडी-निवडीचे भान सासरच्या मंडळींना ठेवावे लागणार आहे, नाहीतर सर्व झाले आणि लग्न मोडले अशी गत होऊन बसायची.