⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

पाणीटंचाईचे संकट! जळगावातील तीन मोठ्या धरणातील पाणीपातळी घटली, आता ‘इतकाच’ पाणीसाठा शिल्लक

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२३ । यंदाचा उन्हाळा अधिक त्रासदायक ठरणार आहे. कारण ‘अल निनो’च्या प्रभावामुळे उन्हाच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविला आहे. याचबरोबर यंदा पाऊस देखील लांबण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

यंदा एप्रिल महिन्यात जळगाव जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या धरणातील पाणी पातळी झपाट्याने कमी झाली आहे. या तीन मोठ्या सिंचन प्रकल्पात सरासरी ४९.२०, तर अन्य लघु व मध्यम प्रकल्पांत सरासरी ४५.७२ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. गिरणा ३०.४४ टक्के, तर हतनूर प्रकल्पात ६३.४३ टक्के साठा आहे.

जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांपैकी हतनूर प्रकल्पावर भुसावळसह अमळनेर, चोपडा व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. तर गिरणा प्रकल्पावर चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोलसह अमळनेर तालुक्यातील काही भाग, अशा १५० ते २०० गावांचा पाणीपुरवठा या धरणातून केला जातो. असे असताना गिरणा प्रकल्पात केवळ ३०.४४ टक्के उपयुक्त जलसाठा असल्याने पाणीटंचाईचे संकट जाणवण्याची शक्यता आहे.

जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघुर प्रकल्पात सद्यःस्थितीत ७४.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. मात्र, शहराला दोन वर्षे पुरेल इतका पाणीसाठा वाघूर धरणात असल्याचे महापालिकेने राज्य शासनाला दिलेल्या अहवालानुसार म्हटले आहे.

त्यामानाने गिरणा व हतनूर प्रकल्पांची उपयुक्त जलपातळी पाहता जिल्हा प्रशासनाच्या टंचाईपूर्व जलनियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने राज्य शासनाला दिलेल्या अहवालानुसार

गिरणावर अवलंबून असलेल्या तालुक्यांपैकी चाळीसगाव शहरासाठी थेट मोठ्या जलवाहिनीद्वारे तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येतो. पाचोरा व भडगाव शहरात तब्बल पाच ते सात दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. पाचोरा शहराला गिरड केटिवेअर, तसेच बहुळा प्रकल्पावरून पाणीपुरवठा सुविधा असूनही पाच ते सात दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे.