अखेर ते ‘एटीएम’ चोरट्यांनी लांबवीले; वाचा कुठे घडली घटना
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । चोपडा तालुक्यातील धानोरा येथील ग्रामपंचायत शॉपिंग कॉम्प्लेक्समधील इंडीकॅश बँकेचे एटीएम अखेर चोरट्यांनी लांबवीले. यापूर्वी याच ठिकाणी दोनदा एटीएम फोडून चोरीची घटना घडली आहे, मात्र त्यानंतरही बँक व्यवस्थापनाकडून या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्यात आलेला नव्हता. त्यामुळे चोरट्यांनी संधी साधत बुधवार दि.२० रोजी मध्यरात्री हे एटीएम मशीन चोरून नेले.
जळगाव जिल्ह्यातील धानोरा (ता.चोपडा) येथील ग्रामपंचायत शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये इंडीकॅश बॅंकेचे एटीएम असून बुधवार दि.२० रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी हे एटीएम मशीन चोरून नेले. एटीएममधील पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरांनी आधी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला असावा, त्यात अपयश आल्याने चोरांनी चक्क एटीएम मशीनच चोरुन नेले असावे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. गुरुवार दि.२१ रोजी सकाळी गावातील पोलिस पाटील दिनेश पाटील यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दांडगे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
एटीएम मशीनमध्ये दीड दोन लाख रुपयांची रक्कम असल्याचे समजते. दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, यावेळी एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये रात्री दोन वाजेच्या सुमारास एक मोठा ट्रक या रस्त्यावरून गेल्याचे दिसत आहे, या ट्रकमध्येच हे एटीएम मशीन टाकून नेले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सुरक्षारक्षकच नाही
अनेक वेळा याच ठिकाणी एटीएम मशीन फोडण्याचे प्रकार झाले आहेत. अद्यापही त्या चोरीचा तपास लागलेला नाही. असे असतांनाही बॅंक व्यवस्थापनाकडून या ठिकाणी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नव्हती. तसेच एटीएमच्या अधिकाऱ्यांनी यासंबंधीची तक्रार दाखल करण्यास असमर्थता दर्शवली असल्याचेही समजते.
चोरीच्या घटनांमध्ये वाढ
जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून चोरीच्या घटना रोखण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. अमळनेर तालुक्यातील गांधली येथे आठ ते दहा जणांच्या टोळीने दरोडा टाकून ६३ बकऱ्या चोरून नेल्या, त्यानंतर टाकरखेडा येथे ३१ शेळ्या चोरून नेल्याची घटना घडली आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.