जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहरातील वाघूरच्या पाईपलाईनची गंमत सर्व जळगावकरांना माहिती झाली आहे. कधी गळती लागते, कधी पाईपलाईन फुटते, कधी मशीन नादुरुस्त तर कधी मोटार नादुरुस्त. सर्व आलबेल कारभार असल्याचा फटका जळगाव शहरवासीयांना सहन करावा लागत आहे. जळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूरची विद्युत केबल खंडित झाल्याने पाणी पुरवठा तब्बल तीन दिवस लांबला आहे. घरात पिण्यासाठी सोडाच वापरायला देखील पाणी शिल्लक नाही. नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत असताना मनपाने पर्यायी व्यवस्था देखील केलेली नाही. नगरसेवक देखील साखर झोपेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
जळगावकरांच्या सुदैवाने गेल्या अनेक वर्षापासून शहरवासियांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागलेली नाही. जळगाव शहरावर विशेषतः वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वरुण राजाची कृपादृष्टी असो कि नसो जळगावकरांना पुरेल इतका पाणीसाठा दरवर्षी असतो. शहरवासियांना दोन दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्याने पाण्याची नासाडी तर होतच नाही शिवाय पाणी देखील वर्षभर पुरते. जळगावकरांना देखील आता दोन दिवसाआड पाण्याची सवय लागलेली आहे.
शहरातील नागरिकांना नेहमीच सवय झालेली असताना अचानक वाघूर पंपींग स्टेशनचा विद्युत पुरवठा बंद झाला आणि मोठी समस्या निर्माण झाली. वाघूर राॅ-वाॅटर पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता खंडीत झाला हाेता. गुरूवारी सायंकाळपर्यंत २२ किमी लांबीची विद्युत लाइन तपासणी केल्यानंतर कुसुंबा गावाजवळील नाल्यात अंडरग्राउंड केबलमध्ये तीन ठिकाणी खंड पडल्याचे उघडकीस आले. शुक्रवारी सकाळपासून केबल जाेडणीचे काम सुरू हाेते; परंतु नाल्याला पावसामुळे पूर आल्याने सातत्याने कामात व्यत्यय येत हाेता.
दोन दिवस उलटले तरी दुरूस्ती पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळे गुरुवारी होणारा पाणीपुरवठा करण्यात शनिवारी देखील मनपा प्रशासन अपयशी ठरले. जळगाव शहरात १९९५ ते २००० च्या काळात मोठ्याप्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली होती. नागरिकांना आठ-आठ दिवस पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. शहरात नगरसेवकांनी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु केला होता. कधी मनपाकडून पाणी पुरवले जात होते. नगरसेवक कैलास सोनवणे यांनी तर स्वखर्चाने प्रभागात पाईपलाईन टाकून विहिरीद्वारे पाणीपुरवठा सुरु केला होता. मनपाने खाजगी विहिरींचे देखील अधिग्रहण केले होते.
पाईपलाईन फुटल्याने मध्यंतरी जळगावकरांना पुन्हा एकदा पाणी टंचाईची झळ सोसावी लागली होती मात्र तेव्हा पाणी दोन ते चार दिवसांनी येणार हे निश्चित होते. जळगावकरांना गेल्या दोन दिवसापासून तोच काळ पुन्हा आठवत आहे. सध्या अनेकांच्या घरी कुपनलिका असल्याने उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीयांना फारशी पाणी टंचाई जाणवत नसली तरी उर्वरित भागात प्रचंड हाल आहे. गेल्या दोन दिवसात पाण्याचे टँकर, वॉटर जारची मागणी प्रचंड वाढली आहे. ‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ तुकोबारायांच्या अभंगाची प्रचिती गल्लोगल्ली येत आहे.
जळगावकर नागरिकांचे हाल होत असताना मनपा प्रशासन मात्र बिनधास्त झाले आहे. अग्निशमन दलाच्या बंबाद्वारे जळगावकरांना पाणीपुरवठा करणे मनपाला सहज शक्य असताना तशी कोणतीही पाऊले उचलण्यात येत नाही. शिवाय पाणीपुरवठा कधी सुरळीत होईल याचे ठोस आश्वासन देखील नागरिकांना मिळत नाही. नगरसेवकांनी देखील काही व्यवस्था केलेली नाही. पाहायला गेले ते जळगाव मनपा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना नगरसेवकांनी आणि भावी इच्छुकांनी नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाणे अपेक्षित होते मात्र सध्या तसे कोणतेही चित्र नाही.
थोडक्यात सांगायचं काय तर.. जळगावकरांना स्वतःच दुखणे स्वतःच उपाय करून दूर सारायचं आहे. जळगावकर नागरिक प्रचंड सोशिक असल्याचे हे आणखी एक ज्वलंत उदाहरण आहे. अगोदरच खड्डे, अस्वच्छता आणि रस्त्यांमुळे त्रस्त असलेल्या जळगावकरांनी आजवर कधी एकत्र येत आवाज उठवला नाही तर आता काय करणार हे देखील निश्चित आहे. आज जळगावकरांचे होणारे हाल लक्षात घेता येणाऱ्या काळात नागरिकांच्या पुढ्यात काय वाढून ठेवलेले असणार हे वेळच सांगेल.