जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२२ । नेपाळमध्ये १९ प्रवाशांना घेऊन जात असलेले तारा एअर 9 NAET ट्विन-इंजिन असलेल्या विमानाचा सकाळपासून संपर्क तुटला आहे. विमानाने पोखराहून जोमसोमसाठी सकाळी ९.५५ वाजता उड्डाण केले होते. विमानात तीन क्रू मेंबर्ससह चार भारतीय आणि तीन जपानी नागरिकांचा समावेश होता. दरम्यान, बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी नेपाळ मंत्रालयाने मुस्तांग आणि पोखरा येथून दोन खाजगी हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. शोधासाठी नेपाळ लष्कराचे हेलिकॉप्टर तैनात करण्याची तयारीही सुरू असल्याची माहिती गृह मंत्रालयाचे प्रवक्ते फदिंद्रमणी पोखरेल यांनी दिली आहे.
तारा एअर 9 NAET ट्विन-इंजिन असलेले विमान सकाळी ९.५५ वाजता पोखराहून जोमसोमसाठी निघाले होते. विमानात कॅप्टन प्रभाकर प्रसाद घिमिरे, सहवैमानिक उत्सव पोखरेल आणि एअर होस्टेस किस्मी थापा यांच्यासह १९ प्रवासी होते. प्रवाशांमध्ये चार भारतीय आणि तीन जपानी प्रवाशांचा देखील समावेश होता. विमान मुस्तांग जिल्ह्यातील जोमसोमच्या आकाशात दिसले आणि नंतर धौलागिरी पर्वताकडे वळवले गेले, त्यानंतर त्याचा संपर्क झाला नाही असे मुख्य जिल्हा अधिकारी नेत्रा प्रसाद शर्मा यांनी सांगितले.
जोमसोम परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे, मात्र विमानसेवा सामान्य आहे. या मार्गावर, विमाने पर्वतांमधून उडतात आणि नंतर दरीत उतरतात. पर्वतीय पायवाटेवर चढणाऱ्या परदेशी गिर्यारोहकांमध्ये हा एक लोकप्रिय मार्ग आहे. भारतीय आणि नेपाळी यात्रेकरूंसाठी मुक्तिनाथ मंदिराला भेट देण्याचा हा एक लोकप्रिय मार्ग आहे. विमानाने सकाळी जोमसोम हिल टाउनसाठी 15 मिनिटांचे नियोजित उड्डाण घेतले होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमानतळाच्या टॉवरशी संपर्क तुटला. अद्याप विमानाचा शोध सुरु आहे.