जळगाव लाईव्ह न्यूज । नोटाबंदीमुळे बाजारातून बनावट नोटा हद्द पार करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, हा दावा फोल ठरत असल्याचे चित्र आहे. सध्या रावेर परिसरातील बाजार पेठेत दैनंदिन व्यवहारात चलनी नोटांच्या पॅक बंडलमध्ये बनावट नोटांचे प्रमाण वाढले आहे. त्यात २०० रुपयाच्या नोटा अधिक दिसून येतात. याशिवाय शंभर रुपयाच्या पॅक बंडलमध्ये कमी किमतीची नोट आत टाकण्याचे प्रकार उघडही होत असून यातून चोरीचा नवीन पायंडा भामट्यांकडून वापरला जात असल्याचे लक्षात येते. त्याचा वापरकर्त्याला नुकसान सहन करावे लागत आहे. या टोळीचा तातडीने पर्दाफाश केला जावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
बाजारात सर्वच स्तरावर आर्थिक उलाढाल वाढली असून व्यवहारातही मोठी वाढ झाली आहे. त्यातच प्रत्येकाकडे कामाच्या व्यापानुसार काम जास्त व वेळेची कमतरता या करणांमुळे मोठी रक्कम देवाण घेवाण करायची असल्यास नोटा मोजणे अवघड जाते. याचाच गैरफायदा अशा टोळीकडून घेतला जात आहे. काही मोठ्या रकमेच्या बंडलमध्ये एक बनावट नोट घातली जात असल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले आहे. तर काही बंडलमध्ये कमी किमतीची एक नोट आत घालून लुटण्याचा प्रकारही समोर येत आहे. मात्र त्या नोटांचे १० बंडल एकत्र करून एक लाख रुपये एकत्र बांधलेले असतात त्यामुळे ती रक्कम व्यक्ती खात्रीने घेऊन जातो. अशावेळी १० हजार रुपयाची रक्कम घेणाऱ्याच्या हातात ९ हजार ९१० रुपये येत आहे. प्रती बंडल ९० रुपये कमी निघत असल्याचा अनेकांना अनुभव येत आहे. अशीच अवस्था इतर बंडलांच्या बाबतीतही होत आहे.
बनावट नोटांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे या परिसरात अशी टोळी सक्रिय असल्याची चर्चा जनतेतून होत आहे. मागील सप्टेंबर महिन्यात भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी नाहटा कॉलेजजवळ अशा टोळीचा पर्दाफाश केला होता त्यात जळगावचे संशयितांना अटक करत त्यांच्याकडून तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. त्याच गुन्ह्यात रावेर येथील संशयित आरोपीकडून ५० हजार रुपयाच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. आजच्या प्रकारामुळे कारवाई झाली असली तरी पूर्ण बंदोबस्त झाला नसल्याचे दिसत आहे.