जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२५ । राज्यावरील अवकाळीचा संकट अद्यापही कायम असून हवामान खात्याकडून आज ३ एप्रिल रोजी देखील राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान जळगावसह पाच जिल्ह्यांना पुढील ३ तासांसाठी महत्वाचा अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान खात्यानं पुढील ३ तासांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजी नगर, जळगाव आणि जालना जिल्ह्यांतील काही ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे. यादरम्यान ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
दरम्यान राज्यातील एकीकडे काही जिल्ह्यांमध्ये तापमान वाढले आहे तर काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पडणारा पाऊस झोडपून काढत आहे. २ एप्रिल रोजी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.
या जिल्ह्यांना अलर्ट?
हवामान खात्याने ३ एप्रिल आणि ४ एप्रिल रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याकडून आज आणि उद्या पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नाशिक घाट, सातारा, सोलापूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. तर अहमदनगर, पुणे घाट, कोल्हापूर घाट, चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
जळगावचा पारा घसरला
दरम्यान जळगाव जिल्ह्यात बुधवारी गारपीट व अवकाळी पावसासाठी शासनाने येलो अलर्ट दिला होता; पण दिवसभर केवळ ढगाळ वातावरण राहिले. यात पारा ३९ वरुन ३५.७ डिग्री सेल्सियसवर आला. ढगाळा वातावरणामुळे पारा ४ अंशांनी घसरल्याने दिलासा मिळाला होता. बुधवारी किमान तापमान २३. ८ डिग्री सेल्सियसवर होते. ५ एप्रिल रोजी कमाल तापमान पुन्हा एकदा चाळीशी गाठण्याची शक्यता आहे.