जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२४ । सध्याच्या काळात फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. विविध प्रकारचे आमिष दाखवून नागरिकांना घडविले जात असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहे. आता अशीच एक बातमी जळगावातून समोर आलीय. विशेष या घटनेत व्यापाऱ्याला जावयानेच लाखोंचा चुना लावला आहे. मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत पिंप्राळ्यामधील वृद्ध व्यापाऱ्याची पुतणीचा पती व त्याच्या भावाने ४८ लाख ५६ हजार रुपयांत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
व्यापाऱ्याने पैसे मागितल्यावर त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बुधवारी दुपारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंप्राळ्यामधील व्यापारी गोपाल प्रभुलाल राठी (६३) यांनी त्यांची एमआयडीसीतील कंपनी २०१८-१९ मध्ये विकल्याने ८८ लाख रुपये मिळाले होते. पुतणी वर्षा विजय मंडोरे, जावई विजय जगदीश मंडोरे आणि जावयाचा भाऊ लक्ष्मीनारायण मंडोरे यांना ही माहिती होती.
दरम्यान, वकिल असलेल्या वर्षाला विजय व लक्ष्मीनारायण भूसंपादनाच्या केसेसमध्ये मदत करत. मंडोरे दांपत्याने काही लोकांकडून पैसे घेतलेले होते. त्यांनी राठी यांना पैसे दिले तर त्याच्या ५ ते ६ पट परतावा देऊ असे आमिष दाखवले. यावर सुरुवातीला राठी यांचा विश्वास बसला नाही. त्यानंतर पुन्हा वर्षा आणि लक्ष्मीनारायणमार्फत विजयने प्रयत्न केले, त्यांच्या दबावाने राठी यांनी वेळ मागून घेतला. नंतर वेळोवेळी विजय, लक्ष्मीनारायण यांना ४८ लाख ५६ हजार रुपये दिले. त्यानंतर राठी यांनी डिसेंबर २०२३ पासून परतावा मागितला असता हुसकावून लावले आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तुमचे पैसे बुडाले असे घुडकावून लावले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राठी यांनी ११ डिसेंबर रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरुन विजय मंडोरे आणि त्याचा भाऊ लक्ष्मीनारायण मंडोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.