जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२२ । जळगाव शहर मनपाच्या महापौर जयश्री महाजन यांचे नाव जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून आमदारकीसाठी देखील इच्छुकांच्या यादीत घेतले जात असताना त्या वेगळ्याच बातमीने चर्चेत आल्या आहेत. ते कारण म्हणजे महापौर जयश्री महाजन या जळगाव ग्रामीणचा दौरा करणार असून लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी त्या समाजबांधवांना आवाहन करणार आहेत.
जळगाव शहर मनपाच्या महापौर जयश्री महाजन या महापौर म्हणून दिवसभर मनपात बसून येणाऱ्या जळगावकरांच्या समस्या जाणून घेत असतात. मात्र जळगाव शहरातील अनेक समस्या आजही प्रलंबित आहेत. जळगाव शहर मनपाचा पंचवार्षिक कार्यकाळ संपत आला असून अवघ्या काही महिन्यांवर निवडणूक येऊन ठेपली आहे. जळगाव मनपा निवडणुकीपूर्वीच अनेकांना आमदारकीचे वेध लागले असून त्या शर्यतीत महापौर जयश्री महाजन यांचेही नाव घेतलं जात आहे.
गेल्या वर्षभराचा प्रवास लक्षात घेता महापौर जयश्री महाजन या राजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या आहेत. महापौर पदाची मोठी मजल मारताना स्थानिक नेत्यांना बाजूला ठेवत त्यांनी थेट पक्षप्रमुखांच्या माध्यमातून बाजी मारली होती. नगरसेविका ते महापौर हा प्रवास पूर्ण करत असतानाच त्यांची वर्णी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालिका म्हणून तर ग.स. सोसायटीमध्ये तज्ञ संचालिका म्हणून लागलेली आहे. जळगाव शहरात महापौर म्हणून कार्यरत असताना त्यांनी आपला मोर्चा जळगाव ग्रामीणकडे वळवला आहे. महिनाअखेरीस भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती येत असून त्या जयंतीचे औचित्य साधत महापौर जयश्री महाजन जळगाव ग्रामीणचा दौरा करणार आहेत.
जळगाव ग्रामीण मतदार संघातील लेवा पाटील समाज बहुल असोदा, भादली, कडगाव, शेळगाव, नशिराबाद, जळगाव खुर्द, बेडी, निमगाव, कानळदा, ममुराबाद, नांदेड, साळवा यासह असंख्य गावात महापौर फिरणार आहेत. कोरोनाची मरगळ दूर झाल्याने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती जल्लोषात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्याचे आवाहन त्या करणार आहेत. जळगाव शहरातील समस्या प्रलंबित असताना महापौर जळगाव ग्रामीणचा दौरा करणार असल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जळगाव ग्रामीणचा दौरा महापौरांना कितपत पथ्यावर पडणार हे तर येणार वेळच सांगणार आहे.