जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२२ । बोदवड तालुक्यातील राजूर येथील रहिवासी असलेले शांताराम बिजारने यांनी प्रदीप बढे यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. पैशांची परतफेड केल्यावर देखील सावकाराने त्यांच्या शेतीवर कब्जा करीत भावाच्या नावाने खरेदी केली. वारंवार विचारणा करून देखील प्रतिसाद मिळत नसल्याने शांताराम बिजारने यांनी न्यायासाठी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे धाव घेतली आहे. माझ्या मागणीचा विचार न केल्यास आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, निवेदन देऊन दोन महिने उलटले तरीही त्यांना न्याय मिळालेला नाही.
बोदवड तालुक्यातील राजूर येथील शेतकरी शांताराम मोतीलाल बिजारने यांनी दिलेल्या निवेदनानुसार, २०१६ मध्ये त्यांना पैशांची आवश्यकता असताना त्यांनी स्वतःची राजूर शिवारातील गट क्रमांक २४अ हि क्षेत्र १ हे १४ आर जमीन खरेदी करून मुक्ताईनगर येथील प्रदीप बारसू बढे यांच्याकडून ३ लाख रुपये ३ टक्के व्याजाने घेतले होते. २०१९ पर्यंत परतफेड करून देखील बढे याने फेड न केल्याची वाच्यता करीत शेतावर जबरदस्तीने कब्जा केला. तसेच शेत भावाच्या नावाने खरेदी केलेले आहे. मी परिस्थितीनुसार लाचार असल्याने मला योग्य तो न्याय मिळावा म्हणून आपल्याकडे अर्ज सादर करीत आहे. मी आणि माझे कुटुंबीय पूर्णतः हतबल झाले असून मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही.
संबंधित सावकाराची व्याज व मुद्दलाची स्वअक्षरातील यादी माझ्याकडे आहे. माझ्यावर फार मोठा अन्याय झाला असून माझ्या अर्जाचा विचार करून योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शांताराम बिजारने यांनी निवेदनाद्वारे केली आहे. १७ एप्रिल २०२२ पर्यंत मला न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. बिजारने यांनी निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिले आहे. गेल्या दोन महिन्यापासून निवेदनावर काहीही कारवाई झाली नसल्याने सावकाराचे फावले होत असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे. माझ्या आत्महत्येनंतर तरी राज्यातील शेतकऱ्यांना सावकाराच्या जाचातून मुक्ती मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.