जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२५ । मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून यादरम्यान, जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा, मुक्ताईनगरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे, घरांचे तसेच जनावरांचे मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान अजून पावसाचा शेवटचा टप्पादेखील जिल्ह्यात जोरदार बरसण्याची शक्यता असून, नवरात्रोत्सवात जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

यंदाच्या जून आणि जुलै महिन्यात म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात देखील पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र १५ ऑगस्टनंतर पावसाने जोरदार आगमन करत जिल्ह्यात हजेरी लावली. गणेशोत्सवच्या आगमनातही जोरदार पाऊस झाला. सप्टेंबरच्या पाहिल्यात आठवड्यात देखील जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. यानंतर पाच-सहा दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानं तापमानात वाढ झाली होती. यामुळे जळगावकर उकाड्याने चांगलाच त्रस्त झाला होता. मात्र यानंतर या आठवड्याच्या सोमवारी आणि मंगळवारी जिल्ह्यातील काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यामुळे घरांचे तसेच शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले.

जळगाव जिल्ह्यात १८ सप्टेंबरपर्यंतच्या सरासरीनुसार ९६ टक्के पाऊस झाला आहे, तर वार्षिक सरासरीच्या ८८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, सप्टेंबर अखेरीस जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचाही अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जिल्ह्यात पुढील आठवड्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

आगामी दोन दिवस जिल्ह्यात ठराविक तालुक्यांमध्ये पावसाची हजेरी लागणार आहे. त्यानंतर मात्र २२ ते २४ सप्टेंबर दरम्यान तुरळक व मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.





