⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

अखेर कानळदा अपघातातील ‘त्या’ दोघांची ओळख पटली; मयत निघाल्या मायलेकी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२३ । जळगाव ते कानळदा रोडवरील समर्थ शाळेजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला होता. यातील दुचाकीस्वाराची ओळख पटली मात्र सोबत असलेल्या इतर दोन महिलांची ओळख पटलेली नव्हती. अखेर त्या दोघांची ओळख पटली असून ते दोघे मायलेकी निघाल्या आहेत. गायत्री प्रविण कुळकर्णी (वय-३४) आणि नंदिनी प्रविण कुळकर्णी (वय-११) दोन्ही (रा. शिवाजी नगर, जळगाव ह.मु.बडवाणी मध्यप्रदेश) असे मयत झालेल्या दोन्ही मायलेकीचे नाव असून त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नेमकी काय आहे घटना?
सोमवारी २६ जून रोजी जळगाव ते कानळदा रोडवरील समर्थ शाळेजवळ भीषण अपघात झाला होता. महेश गोकूळ जोशी रा. पिंप्री ता. धरणगाव हे दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीवाय ९९०३) ने कानळदा रोडवरून जळगाव शहराकडे येत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत दुचाकीवर अनोळखी महिला आणि एक मुलगी बसलेले होते. कानळदा गावाजवळील समर्थ शाळेसमोरून जात असतांना दुचाकीस्वार महेश यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तिघे रस्त्यावर पडले.

तेवढ्यात जळगाव शहराकडून येणारी रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ८०७०) ने रोडवरील तिघांना चिरडले व रिक्षा देखील पलटी झाली. यात अपघातात दुचाकीवरील तीन जण गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होत. जखमी झालेल्या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील महेश जोशी यांची ओळख पटली होती. तर सोबत असलेल्या महिला आणि मुलीची ओळख पटलेली नव्हती. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केल्यानंतर पोलीसांनी तपासाला सुरूवात केली. अखेर पोलीसांना महिलांची ओळख पटविण्यास यश आले. गायत्री प्रविण कुळकर्णी आणि नंदिनी प्रविण कुळकर्णी अशी दोघांचा नावे निष्पन्न झाली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.कॉ. नरेंद्र पाटील करीत आहे.