⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

Bhadgaon : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने संपविले ; असा झाला खुनाचा उलगडा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२४ । भडगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहबाह्य संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीनेच काटा काढला आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने अपघाताचा बनाव करत पतीचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. किशोर शिवाजी पाटील (वय ४५ रा. पाळासखेडे ता. भडगाव) असे मयत व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी प्रियकरासह पत्नीवर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील पत्नीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत असे की, किशोर शिवाजी पाटील (वय ४५, रा. पळासखेडे, ता. भडगाव) हा पत्नी पुष्पा पाटील हिच्यासोबत वास्तव्यास होते. मात्र किशोरच्या पत्नीचे राजेंद्र शेळके महाराज (रा. आळंदी जिल्हा पुणे) याच्यासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित झाल्याने किशोर पाटील आणि पत्नी पुष्पा पाटील यांच्यात वारंवार वाद होत होते. त्यामुळे या अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्याचे विवाहीता पुष्पा पाटील हिने ठरविले. त्यानुसार प्रियकर राजेंद्र शेळके महाराज याच्या मदतीने नियोजन केले.

यात प्रियकर राजेंद्र शेळके याने पैसे देण्याच्या बहाण्याने किशोर पाटील यास पळासखेडे ते तरवाडे मार्गावर बोलावले. त्यानुसार किशोर पाटील शनिवार दि. ३० मार्च २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता घरातून निघाले असता त्या अगोदरच दबा धरून बसलेले राजेंद शेळके याने अपघाताचा बनाव केला. त्यानंतर किशोर पाटील याला ठार मारले. हा प्रकार रविवारी दि. ३१ मार्च २०२४ रोजी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंह देशमुख, भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार यांच्यासह भडगाव पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून ग्रामीण रूग्णालयात मृतदेह नेण्यात आला आहे. तर पोलीस पथकाने विवाहीता पुष्पा पाटील हिला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात प्रियकरासह विवाहीते विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.