जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मे २०२२ । मॉन्सून (Monsoon) यंदा लवकर दाखल होणार, असा दिलासादायक अंदाज हवामान खात्यानं (IMD) वर्तवला होता खरा. पण त्याआधी वाढलेल्या तापमानानं घामाघूम झालेल्या नागरिकांना तूर्तासतरी दिलासा मिळण्याची कोणतीही शक्यता नाहीच. महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाची नोंद शनिवारी जळगावमध्ये झाली. काल जळगाव येथे ४४.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे उष्णतेची लाटेमुळे जळगावकर चांगलेच हैराण झाले आहे.
जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून उष्णतेची लाट कायम असून तापमानाचा पारा ४३ अंशावर स्थिर होता. मात्र, शनिवारी तापमानाचा पारा ४४ अंशावर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे काल शनिवारी राज्यातील सर्वाधिक ४४.५ अंश इतके तापमान होते.
जिल्ह्यात सकाळ १० वाजेपासूनच तापमानाचा पारा ४० अंशावर जात असल्याने नागरिकांना हा उष्मा असह्य झाला आहे. दिवसा घराबाहेर न पडण्याबरोबरच थंडगार फळांबरोबर कोल्ड्रींक्स, ताक, सोलकडी, माठातील पाण्याने गारवा शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. शनिवारी सायंकाळी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण झाले होते. तरी देखील सायंकाळच्या वेळेस उष्ण वाऱ्यामुळे उष्णतेच्या झळा जाणवत आहे.
राज्यातील अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यात ११ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर दुसरीकडे सध्या उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव, नाशिकमध्ये कमाल तापमानात वाढ झाली.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमानजवळ गोलाकार वाऱ्यांमुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे ८ मे रोजी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र या वादळाचा महाराष्ट्रावर कुठलाही परिणाम होणार नाहीय.