जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीमुळे शहराला गेल्या दोन दिवसापासून पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. दोन दिवस पाणी न आल्याने अनेकांच्या घरात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. जळगावातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात देखील सकाळपासून पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. कारागृह प्रशासनाने बंदिवान कैद्यांसाठी सकाळी पाण्याचे जार तर दुपारी टँकर मागविले होते.
जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारी वाघूरची पाईपलाईन नेहमीच नादुरुस्त होत असते किंवा कुठे ना कुठे गळती लागते हा जळगावकरांना चांगलेच माहिती झाले आहे. गेल्या दोन दिवसापासून पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असल्याने शहराला करण्यात येणारा पाणीपुरवठा उशिराने होत आहे. सुरुवातीला पाणीपुरवठा एक दिवस उशिराने करण्यात येणार होता परंतु दुरुस्तीचे काम लांबल्याने आणखी एक दिवस उशीर झाला आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती कारागृहाची क्षमता अगोदरच कमी असताना दुपटीपेक्षा जास्त म्हणजेच ५७५ च्या जवळपास कैदी जिल्हा कारागृहात आहेत. कारागृहातील पाणी देखील शनिवारी सकाळच्या सुमारास संपले. कैद्यांना पिण्यासाठी पाणी नसल्याने सुरुवातीला प्रशासनाकडून पाण्याचे जार मागविण्यात आले आणि नंतर दुपारी पिण्याच्या पाण्याचे टँकर मागविण्यात आले होते. कैद्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या पुरेशी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती कारागृह अधीक्षक गजानन पाटील यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना दिली आहे.