जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२५ । शिवसेना शिंदे गटाने संपूर्ण महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर सुरु केले आहे. तर भाजपकडून विरोधी कार्यकर्त्यांना वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातच आता जळगाव जिल्ह्यात भाजपने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. अनेक दिग्गज नेते, पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश घेतला.

राज्यात महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असता यातच ठाकरे गटाच्या शिवसेनेला लागलेली गळती काही थांबता थांबत नसून अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला रामराम करत सत्ताधारी पक्षात प्रवेश घेताना दिसून येत आहे यातच आता जळगावच्या एरंडोलमधील तीन माजी नगराध्यक्ष, पंचायत समितीचे दोन माजी सभापतींसही इतर पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, राजेंद्र चौधरी, माजी उपनगराध्यक्ष आणि माजी नगरसेवक भाजपमध्ये सहभागी झाले. मुंबईतील भाजप कार्यालयात मंत्री गिरीश महाजन, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
तसेच एरंडोल विधानसभेतून अपक्ष निवडणूक लढवणारे भगवान महाजन यांनाही भाजपमध्ये प्रवेश घेतला. उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभेनंतर ठाकरे गटातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे तालुक्यात राजकीय समीकरणे बदलली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे.