⁠ 
सोमवार, जानेवारी 13, 2025
Home | जळगाव जिल्हा | शेतीकामासाठी यंत्राचा वापर करतांना अशी घ्या काळजी

शेतीकामासाठी यंत्राचा वापर करतांना अशी घ्या काळजी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । ‘श्रम कमी आणि वेळेची बचत’ यामुळे जवळजवळ सर्वच क्षेत्रातील कामे यंत्राच्या सहाय्याने केली जात आहेत. शेती देखील त्याला अपवाद नाही. नांगरणीपासून ते काढणी, मळणीपर्यंतचे काम यंत्राच्या सहाय्याने केली जात आहेत. शेतीच्या कामांमध्ये यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या यंत्राचा वापर जितका चांगला तितकाच धोकेदायकही आहे. यंत्रांमुळे वेळेची बचत होत असली तरी अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे यंत्राच्या सहाय्याने करतांना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. खरीपातील बहुतांश पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. काही पिकांची काढणीपश्‍चात कामे सुरू असून, त्यात मळणी हे काम अत्यंत महत्त्वाचे काम असते. त्यामुळे ही कामे करतांना कोणती काळजी घ्यावी, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

पीक टाकताना ही घ्या काळजी
मळणी यंत्राचा वेग अधिकचा असल्याने एकापाठोपाठ पीक टाकावे लागते. यंत्रात पीक कमी पडू नये म्हणून शेतकरी अधिक वेगाने पीक टाकण्याचा प्रयत्न करतो आणि तेथेच अडचणी निर्माण होतात. त्यामुळे यंत्रामध्ये पीक टाकण्यासाठी दोन व्यक्ती नेमणे गरजेचे आहे. एका व्यक्तीने खालून पीक उचलून द्यावे आणि दुसऱ्या व्यक्तीने ते मशिनमध्ये टाकावे, असे केल्यास अपघाता होण्याची शक्यता कमी होऊ शकते.

रबरी किंवा चामड्याचे हातमोजे घाला
काही व्यक्ती अधिक उंचीवर उभी राहून किंवा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून थेट यंत्रात पीक टाकण्याचा प्रयत्न करतात. हातांचा वापर करण्याऐवजी पायाने ढकलून पीक ढकलण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी तोल जाण्याचा धोका जास्त असते. पिकासोबत हात किंवा पाय आत खेचला जाऊन अपघात होऊ शकतो. सोयाबीन, हरभरा, मसूर, बाजरी इत्यादी झुडपी पिके मळताना विशेष काळजी घ्यावी. पीकाची मळणी सुरु असताना अनेकदा शेतकरी हाताला जुन्या कापडाचा तुकडा किंवा पोते गुंडाळतात. हे देखील तेवढेच धोक्याचे आहे. कारण यामध्ये कापड, पोते यांचे धागे, पट्टी किंवा लोंबणारे भाग हे यंत्राच्या धुराकडे खेचले जाऊ शकतात. त्यामुळे हात आत जाऊन अपघात होऊ शकतो. हातात रबरी किंवा चामड्याचे हातमोजे घालावेत.

कामाचे नियोजन करा
हंगाम उरकता घेण्याच्या गडबडीत मशिन ऑपरेटर हा सलग काम करतो. सततच्या कामामुळे थकवा आलेला असतो. रात्रीच्या वेळी काम सुरु राहिले तर याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. कोणत्याही स्थितीमध्ये थकल्यावर काही काळ तरी विश्रांती घ्यावी. शक्य असल्यास यंत्रावर काम करणाऱ्या व्यक्ती काही तासानंतर बदलून त्याला आराम देण्याची गरज आहे. त्यामुळे त्यानुसार नियोजन केले गेले पाहिजे.

यंत्राची तपासणी करा
यंत्र सुरू करण्यापूर्वी त्याची तपासणी करून घ्यावी. विशेषतः थ्रेशरच्या आत फिरणारे लोखंडी भाग, ड्रममधील भाग सैल नाहीत, त्यांचे आवाज येत नाहीत ना, घासले जात नाहीत ना, हे लक्षपूर्वक पाहिले पाहिजे. अनेक वेळा सतत होणाऱ्या घर्षणामुळे आग लागू शकते. विजेवर चालणाऱ्या यंत्रा संदर्भात विद्युत तारा, जोड उघडे राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी. या वायरी फार ताणू नयेत. त्यातून अपघात होऊन विजेचा धक्का बसणे किंवा आग लागणे अशा घटना घडू शकतात.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.