जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२२ । शहरातील गोलाणी मार्केटमध्ये सोमवारी रात्री २ वाजेच्या सुमारास छतावरून पडल्याने एका ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, मयत मुकेश राजपूत (परदेशी) याच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केला आणि तपासाची चक्रे फिरू लागली. शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या एकच दिवसात गुन्हा उघड करीत दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. निखिल राजेश सोनवणे रा.सम्राट कॉलनी, अमर उर्फ लखन शांताराम बारोट वय २९ रा.कासमवाडी, रचना कॉलनी, पराग उर्फ बबलू रवींद्र आरखे वय २३ न्यू सम्राट कॉलनी अशी आरोपींची नावे आहेत.
शहरातील नाथवाडा परिसरात राहणारा मुकेश रमेश राजपूत हा तरुण सोमवारी रात्री २ वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटच्या छतावरून पडल्याने डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला दोन तरुणांनी आणि त्यानंतर मुकेशचा भाऊ उमेश राजपूत याने शहर पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. सीएमओ डॉ.अजय सोनवणे यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपास संजय बडगुजर करीत होते. मंगळवारी दुपारी मुकेशच्या नातेवाईकांनी त्याचा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता.
शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांनी लागलीच डीबी पथकाला सूचना देत तपासचक्रे फिरविण्यास सांगितले. पथकातील कर्मचाऱ्यांनी गोलाणी मार्केटमधील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुकेशला दोन जण फेकताना कैद झाल्याचे समोर आल्यानंतर लागलीच पथकाने इतर सीसीटीव्ही तपासले. निखिल आणि बबलू नामक तरुणाची ओळख पटल्यावर शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी भास्कर ठाकरे यांनी सम्राट कॉलनी परिसरात दोघांना हेरले. तपास पथकातील भास्कर ठाकरे, विजय निकुंभ, योगेश पाटील यांनी संशयितांना ताब्यात घेतले. तर पोलीस कर्मचारी प्रफुल्ल धांडे, गजानन बडगुजर, रतन गिते यांनी तपासात सहकार्य केले.
शहर पोलीस ठाण्यात आणल्यावर सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह पथकाने पोलिसी खाक्या दाखविताच दोघे पोपटासारखं बोलू लागले. अनैतिक संबंधांच्या प्रकारातून मुकेशचा काटा काढण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. खून करणाऱ्या दोघांनी काही सायकलची आणि भंगारची देखील चोरी केल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस तपास सुरू असून खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी करीत आहे.