डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील शल्यचिकीत्सकांच्या टीमचे उल्लेखनीय यश

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव काही दिवसांपासून तीव्र पोटदुखी, पोट फुगणे, सतत गॅस होणे तसेच संडास न होण्याच्या त्रासाने हैराण झालेल्या ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांना पडलेला गंभीर पीळ डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ज्ञ शल्यचिकीत्सकांच्या टीमने वेळेत ओळखून शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सोडविला. वेळेवर निदान आणि तातडीच्या उपचारामुळे महिलेचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

याबाबत माहिती अशी की, पाचोरा येथील सरला भिवसने (वय ३८) या महिलेला मागील काही दिवसांपासून सतत पोट फुगणे, तीव्र वेदना, गॅसचा त्रास तसेच पूर्णपणे संडास न होण्याची समस्या जाणवत होती. सुरुवातीला साधा पोटदुखीचा त्रास समजून दुर्लक्ष करण्यात आले. मात्र वेदना वाढत गेल्याने आणि पोट अधिक फुगू लागल्याने रुग्णाला तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल करण्यात आले.







