दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबलला भारत सरकारचा ‘सर्वोच्च संस्था’ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२३ । भारत सरकार सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय विभागातर्फे दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठीचा ‘सर्वोच्च संस्था’ राष्ट्रीय पुरस्कार दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबलला नुकताच जाहीर झाला आहे. ३ डिसेंबर रोजी दिल्लीत हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे .पुरस्कार महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरीत होणार आहे.
मनोबल हा प्रकल्प देशातील पहिला प्रकल्प आहे, ज्या मध्ये १८ वर्षावरील सर्व प्रकारच्या दिव्यांगांना विनामूल्य निवासी सर्व प्रकारचे उच्च शिक्षण व त्यासाठी आवश्यक स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण, तंत्रज्ञान प्रशिक्षण दिले जाते. सर्व प्रकारच्या दिव्यांगांसोबतच सर्व समावेशित शिक्षणासाठी आवश्यक वातावरण निर्माण होण्यासाठी दिव्यांगांसोबतच १८ वर्षांवरील अनाथ, आदिवासी ग्रामीण, ट्रान्सजेंडर विद्यार्थी, विद्यार्थिनींना सुद्धा एकत्र निवासी शिक्षण प्रशिक्षण या प्रकल्पात दिले जाते. या प्रकारचा हा देशातला पहिला आदर्श प्रकल्प मानून राष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार संस्थेला या वर्षी जाहीर झाला आहे.
मनोबल प्रकल्पात जळगाव व पुणे येथे १२ राज्यांमधील व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील ३८० विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण प्रशिक्षण घेतात, सोबतच देशभरातील सुमारे ५०० हुन अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण प्रशिक्षण दिले जाते. त्यासोबतच अफगाणिस्तान, भूतान, पाकिस्तान श्रीलंका येथील विद्यार्थ्यांना सुद्धा ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाते. संस्थेने लोकसहभागातून देशातील पहिला सर्व प्रकारच्या दिव्यांगांना अडथळाविरहित असणारा निवासी उच्च शिक्षणासाठीचा प्रकल्प नुकताच बांधून पूर्ण केला आहे. या मध्ये उच्च शिक्षणाची तसेच स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणाची, तंत्रज्ञान प्रशिक्षणाची सुविधा आहे. संपूर्ण परिसर दिव्यांगांसाठी अडथळाविरहित आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारे मानव संसाधन सुद्धा उपलब्ध आहे.
समाजातील मुख्य प्रवाहामध्ये दिव्यांग आणि वंचित विद्यार्थी आले पाहिजे. फक्त सामान्य रोजगारा पर्यंत ते सिमीत न राहता समाजाच्या सर्व प्रभागात उदारणार्थ प्रशासन, शासन, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, सामाजिक कार्य, शिक्षण अश्या सर्व क्षेत्रांमध्ये उच्च स्तरावर हे विद्यार्थी जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व व्यवस्था एकाच छताखाली संस्थेने लोकसहभागातून निर्माण केलेल्या आहेत.संस्थेत कार्यरत सहकारी, देणगीदार व हितचिंतक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच या आधी कधीही न घडलेले कार्य संस्थेच्या माध्यमातून उभे राहीले आहे अश्या भावना यावेळी दीपस्तंभ फाऊंडेशनचे संस्थपाक यजुर्वेंद्र महाजन यांनी व्यक्त केल्या आहे.