जळगाव लाईव्ह न्यूज । धरणगाव तालुक्यातील पथराड गावाच्या शिवारात शेतकऱ्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे. अशोक अमृत लंके (वय ४२) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी कर्जबाजारील कंटाळून आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत असं की, धरणगाव तालुक्यातील पथराड येथील अशोक अमृत लंके हे दोन दिवसांपासून बेपत्ता होते. याबाबत त्यांचे वडील अमृत लंके यांनी ५ जानेवारीला पाळधी पोलिस दूरक्षेत्रात हरविल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, दुपारी तीनच्या सुमारास ग्रामपंचायतीच्या विहिरीजवळ पाणीपुरवठा विभागाचा शिपाई गेला असता, त्याला विहिरीत मृतदेह आढळून आला. याबाबत त्यांनी गावात माहिती कळविली.
दरम्यान गिरणा धरण भरल्यामुळे पाटाला पाणी आले होते. रब्बी हंगामात पेरणीसाठी बी- बियाणे व रासायनिक खते घेण्यासाठी पैसे नसल्याने त्याने गावात बऱ्याच लोकांकडे पैशांची मागणी केली. मात्र, पैसे न मिळाल्याने तो घरी कोणाला काही न सांगता निघून गेला होता. त्याचा संपूर्ण परिसरात शोध घेतल्यावरही शोध लागला नाही. अखेर रविवारी (ता. ५) ग्रामपंचायतीच्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला.
म्हाताऱ्या बापाचा आक्रोश
माहिती मिळताच अशोक यांचे वडील व नातेवाइकांनी विहिरीकडे धाव घेतली. विहिरीत आढळून आलेला मृतदेह अशोक लंके यांचा असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत पाळधी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविला. अशोक लंके अल्पभूधारक शेतकरी असून, त्यांच्या नावावर विविध विकास कार्यकारी सोसायटी व बचत गटाचे कर्ज आहे. या वर्षी अतिवृष्टीमुळे पिके वाया गेल्यामुळे अशोक हतबल झाले होते.