जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२१ । धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील ५५ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. कैलास धनसिंग पाटील (५५) आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आत्महत्यापूर्वी कैलास मुलाला आणि नातेवाईकांना फोने करून मला जगायचं नाही…. माझा हा शेवटचा फोन.. असा फोन करीत आपली जीवनयात्रा संपविली.
कैलास पाटील यांच्यावर ७ लाखांचे कर्ज होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास घरातील सर्वजण झोपलेले असताना स्वत:चे शेत गाठले. त्यानंतर पहाटे पावणे तीनच्या सुमारास त्यांनी नातेवाइकांसह पत्नी, मुलं, यांच्याशी माझा शेवटचा फोन असल्याचे सांगत संवाद साधला. त्यामुळे पाटील यांच्या कुटुंबियांनी तात्काळ धावाधाव करत आपले शेत गाठले. टॉर्चच्या प्रकाशात कुटुंबियांनी शेताच्या दिशेने धाव घेतली. तसेच रात्रीच्या अंधारातच शेतात शोधाशोध केली, त्यावेळी कडुनिंबाच्या झाडाला कैलास पाटील यांनी गळफास घेतल्याचे दिसले. नातेवाईकांनी तातडीने त्यांना खाली उतरवून, जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर बोरखेडा येथे अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. मृत कैलास पाटील यांच्या आत्महत्येमुळे गावात सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेमुळे गावात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. काही दिवसांपासून मृत कैलास पाटील नैराश्यात होते, त्यातूनच त्यांनी जीवन संपवले.
रात्री कीर्तन ऐकले
बोरखेडा गावात ३० रोजी रात्री कीर्तनाचा कार्यक्रम होता. या कीर्तनाला कैलास पाटील हजर होते. कीर्तन संपल्यावर घरी जाऊन नवे कपडे परिधान करून त्यांनी शेत गाठून आत्महत्या केली. त्यांच्यावर विकासो तसेच खासगी मिळून आठ लाखांचे कर्ज होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.