⁠ 
शुक्रवार, जून 14, 2024

लग्नाच्या आठ महिन्यानंतर 22 वर्षीय विवाहितेचं धक्कादायक पाऊल ; जळगावातील घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२४ । एका २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज मंगळवारी जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगरमध्ये उघडकीस आली. मीना सनी राठोड (२२, रा. धानोरा, ता. जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव असून तिला पतीनेच मारले असल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे.

हरिविठ्ठल नगरातील माहेर असलेल्या मीना यांचे आठ महिन्यांपूर्वीच सनी राठोड याच्याशी लग्न झाले. पती सतत मारहाण करीत असल्याने विवाहिता एक ते दीड महिन्यांपूर्वी जळगावात हरिविठ्ठल नगरात राहणाऱ्या आजीकडे आल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच त्या एका खासगी डॉक्टरकडे कामाला लागल्या होत्या. मंगळवार दिनांक ११ जून रोजी सकाळी मीना राठोड यांचा भाऊ त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधत होता. मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने त्याच्या मित्राला पाहण्यासाठी पाठविले.

त्या वेळी मित्र व त्याची आई विवाहिता राहत असलेल्या घरी गेले असता त्यांना मीना या गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या. त्यांनी विवाहितेचा भाऊ व इतरांना माहिती दिली. त्यांनी विवाहितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल तायडे यांनी तपासून मयत घोषित केले. मीना राठोड यांना पती सतत मारहाण करीत होता, असा आरोप माहेरच्या मंडळींनी केला. या मारहाणीमुळेच विवाहिता आजीकडे आली होती. त्यानंतरही पतीने जळगावात येऊन तिला मारहाण केली. तसेच मंगळवारी सकाळीदेखील पतीनेच तिला मारले असल्याचा आरोप विवाहितेचे वडील सुरसिंग पवार व अन्य नातेवाईकांनी केला.