जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२५ । दैनंदिन गरजेच्या वस्तू महाग होताना दिसत आहे. यातच सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसणार आहे. साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी, मिठाई, बिस्कीट, शीतपेये यांसारखे साखरयुक्त पदार्थ महाग होऊ शकतात. साखर दरवाढीचे कारण म्हणजे देशभरात साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता आणि साखरेच्या निर्यातीस देण्यात आलेली परवानगी.

भारताला दरवर्षी सुमारे 280 लाख टन साखरेची गरज असते, मात्र यंदाच्या हंगामात उत्पादन केवळ 259 लाख टन राहील, असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने वर्तवला आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (ISMA) उत्पादन 264 लाख टन, तर ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने (AISTA) 258 लाख टन राहील, असे भाकीत केले आहे
केंद्र सरकारने 10 लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिली, त्यापैकी ५ लाख टनाहून अधिक साखर निर्यातही झाली. मात्र यातच देशभरात साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता असून यामुळे साखरेचा दर वाढण्याची शक्यता आहे.
यंदा ऊस उत्पादनावर प्रतिकूल हवामानाचा मोठा परिणाम झाला आहे. गाळप हंगाम साधारणपणे 140-150 दिवसांचा असतो. मात्र यंदा तो केवळ 83 दिवस चालला. त्यामुळे महाराष्ट्रातील साखर उत्पादन केवळ 80 लाख टन राहणार आहे. साखर कारखान्यांचे 365 दिवसांचे खर्च असूनही गाळप हंगाम कमी असल्याने आर्थिक तोटा वाढण्याची भीती आहे.