आयुष्याचा बेरंग होण्यापूर्वीच वृध्द पेंटरवर यशस्वी शस्त्रक्रिया
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ञांकडून उपचार
जळगाव लाईव्ह न्यूज । पेंटींग काम करून सर्वसामान्यांच्या आयुष्यात रंग भरणार्या ६५ वर्षीय पेंटरला (Painter) अपघात झाल्याने हातापायाची ताकद गेली होती. त्यामुळे त्याला भविष्याची मोठी चिंता लागली होती. मात्र आयुष्याचा बेरंग होण्यापूर्वीच या वृध्द पेंटरवर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील (Dr.Ulhas Patil Hospital) मेंदू व मणका विकार तज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी यशस्वी शस्त्रक्रिया (Surgery) करून त्याला भविष्यातील चिंतेतून मुक्त केले.
याबाबत माहिती अशी की, सुभाष कानडे (वय ६५) हे पेंटींग काम करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवितात. एकेदिवशी पेंटींगचे काम करतांना अचानक ते खाली कोसळले. या अपघातामुळे त्यांच्या हाता पायाची ताकद नाहीसी झाली होती. अशा परीस्थितीत त्यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी मेंदू व मणका विकार तज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी कानडे यांची एमआरआय तपासणी केली. त्यात सी -७ मध्ये कॉर्ड कन्फ्युजन होते. तसेच कानडे यांना उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकाराचा देखिल त्रास होता. त्यामुळे शस्त्रक्रिया करणे अत्यंत जोखमीचे होते. तसेच त्यांना शारीरीक संवेदना देखिल नव्हत्या.
अशा परीस्थितीत शस्त्रक्रिया करणे हे एक मोठे आव्हानच होते. अशा गुंतागुंतीच्या परीस्थितीतही विभागप्रमुख डॉ. शिवाजी सादुलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मेंदू व मणका विकार तज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी आपला अनुभव अन् कौशल्य पणाला लावत भूल देत त्यांच्यावर सी ४,५,६ डी १, डी २ फिक्सेशन विथ सी -७ लॅमिनोटोमीची शस्त्रक्रिया केली. तब्बल पाच तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या आठवडाभरात त्यांच्या हातापायाची ताकद पुर्ववत होऊ लागली होती. ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतंर्गत मोफत करण्यात आली.
शस्त्रक्रियेसाठी डॉ. अर्शिल, डॉ. अपूर्वा, भूलशास्त्र तज्ञ डॉ. सतीश यांनी सहकार्य ेकले. शस्त्रक्रियेमुळे सुभाष कानडे यांचे आयुष्य बेरंग होण्यापूर्वीच पुन्हा एकदा उत्साहाने ते कामाला लागले.