जळगाव शहर

‘शावैम’मध्ये जन्मतःच कर्णबधीर बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२१ । संसारवेलीवर मुलगा झाला…मात्र मुलाला जन्मत:च ऐकू येण्यास अडचण…आई-बाबांच्या दु:खात भर पडली…मात्र पालक वर्ग राष्ट्रीय बाल स्वास्थ केंद्राच्या संपर्कात आले…मुलाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली…उपचार झाले…आज मुलगा ऐकतो, बोलतो…हि सुखद घटना जळगावात घडली आहे. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कान-नाक-घसा विभागाच्या डॉक्टरांच्या मेहनतीची जोड मिळाली. यामुळे आयुष्यभर मुकबधीर राहण्यापासून बालक वाचला आहे.

जामनेर तालुक्यातील कष्टकरी परिवारातील सविता-वसंत गांगुर्डे यांच्या अडीच वर्षांच्या मुलाला हि समस्या निर्माण होती. जन्मतःच जर ऐकू येत नसल्याने त्यांनी शासकीय रुग्णालयाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ केंद्राला संपर्क साधला. तेथे वर्षा वाघमारे, डॉ. खालिद पठाण यांनी त्यांना धीर दिला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. अक्षय सरोदे यांच्या पथकाने सदर बालकाची तपासणी व निदान केले. राष्ट्रीय बाल स्वास्थ केंद्रातर्फे पुणे येथे कानामागील नसजवळ ‘कोन्क्लिअर इम्प्लांट’ नावाची शस्त्रक्रिया झाली. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून वैद्यकीय पथकाने कौशल्य पणाला लावले.

शस्त्रक्रियेनंतर बालकाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कान-नाक-घसा विभागातर्फे स्पीच थेरपी देण्यात येत आहे. त्यामुळे हा बालक सामान्य बालकांप्रमाणे ऐकू व बोलू शकत आहे. सुमारे १२ ते २० लाख रुपयांची हि उपचारपद्धती असून केवळ राष्ट्रीय बाल स्वास्थ केंद्र आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागाच्या प्रयत्नांनी या गरीब परिवाराला शून्य रुपये खर्च आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. बालकाच्या पालकांनी वैद्यकीय पथकाचे आभार मानले आहे.बालकावर उपचार करण्यासाठी कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. अक्षय सरोदे, डॉ. विनोद पवार, डॉ. नितीन विसपुते, डॉ. हितेंद्र राऊत, ऑडीओलॉजिस्ट व स्पीच पेथोलोजीस्ट राजश्री वाघ, मुनज्जा शेख, राष्ट्रीय बाल स्वास्थ केंद्राचे वर्षा वाघमारे, डॉ. खालिद पठाण यांनी परिश्रम घेतले.

सकारात्मक प्रयत्नांनी बालकावर यशस्वी उपचार

ज्या मुलांना जन्मत: ऐकू येत नाही, ते बोलूही शकत नाही. म्हणून अशा मुलांना जर योग्य वयात तपासणी व निदान केले तर ते आपल्या सामान्य माणसासारखे ऐकू व बोलू शकतात. आजही समाजात अनेक मुले असे आहेत. जे उपचार न मिळाल्याने मुकबधीर जीवन जगत आहेत. त्यांची पूर्ण जबाबदारी पालकांवर येऊन पडते. नांद्राच्या प्रकरणात पालकांनी वेळोवेळी डॉक्टरांनी सांगितलेली जबाबदारी स्वीकारली आणि सकारात्मक प्रयत्नांनी बालकावर यशस्वी उपचार झाले.

– डॉ. अक्षय सरोदे, विभाग प्रमुख.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button