जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२५ । भुसावळ रेल्वे विभागाने राबवलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत अजब प्रकार समोर आला आहे. ज्यात एलटीटी-कामाख्या या संपूर्ण वातानुकूलित विशेष एक्स्प्रेसमधून मनमाड ते भुसावळ दरम्यान विनातिकीट प्रवास करताना १३२ उच्चभ्रू रेल्वेच्या विशेष तिकीट तपासणीसांच्या पथकाला आढळले.

विशेष म्हणजे धावत्या गाडीत प्रवाशांना लिनेन बॉय म्हणजे आसनावर गादी, चादरी यांची सेवा देणाऱ्या सात मुलांच्या संगनमताने हा गैरप्रकार सुरू असल्याचे उघड झाले असून यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या १३२ प्रवाशांकडून पावणेचार लाख रुपये वसूल करण्यात आले असून सात जणांना अटक करण्यात आलीय.
शफीकुल, तयजुल इस्लाम, फारुकुद्दीन, सईदुल इस्लाम, रफिकुल इस्लाम, सद्दाम हुसैन आणि हबीब अली अशी अटक करण्यात आलेल्या बनावट लिनेन बॉयची नावे आहेत. दंर्यान एकिकडे लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये दोन महिने आधी आरक्षणासाठी प्रतिक्षेवर राहावे लागत असताना दुसरीकडे अशा साखळीतून उच्च पातळीवरूनच आरक्षणात गैरव्यवहार उघडकीस आल्याने प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वाणिज्य विभाग व रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) यांच्या पथकाने ट्रेन क्र. १२५१९ लोकमान्य टिळक टर्मिनस-कामाख्या (एलटीटी-कामाख्या) एसी एक्स्प्रेसमध्ये मनमाड ते भुसावळ स्थानकादरम्यान अचानक तिकीट तपासणी मोहीम राबवली यात विनातिकीट प्रवाशांकडून काही लिनेन बॉय हे पैसे वसूल करीत होते.
रेल्वे अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता हे लिनेन बॉयच तोतया असल्याचे आढळून आले. त्यांना लागलीच अटक करून भुसावळ येथील आरपीएफ अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या मोहिमेचे नेतृत्व सहायक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट तपासणी) भुसावळ यांनी केले. १२ फिरत्या तिकीट तपासनीस (टीटीई) व मनमाडहून आलेले पाच आरपीएफ कर्मचारी सहभागी झाले होते.