चोरीची कुठलीच पोलीस तक्रार नाही…तरी चोरीला गेलेली सायकल पुन्हा आली दारी
जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ जून २०२१ । शहरात मोठमोठ्या घरफोड्या होतात. परंतु तक्रार देण्यास नागरिक टाळाटाळ करतात. दिलीच तर नावापुरती तक्रार देतात. नंतर तपास लागो ना लागो, अशा भूमिकेत ते असतात. शहरातून दिवसाला दहा ते बारा मोटारसायकली चोरीला जात असताना, चोरीला गेलेली सायकल परत मिळेल हे कुणी स्वप्नातही कल्पना करू शकत नाही. चोरीला गेलेल्या सायकलीची कुठलीच पोलिस तक्रार केली नसताना पोलिसांनी तिच्या नंबरवरून मालकाचा शोध लावून ती परत मिळवून दिली.
याबाबत असे की, मयूर केदारनाथ मालू यांची सायकल चोरीस गेली होती. परंतु त्यांनी सायकल चोरी गेली जाऊनही तक्रार केली नव्हती. मात्र, २४ मेस जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रवीण भोसले, योगेश ठाकूर, प्रशांत पाठक गस्त घालत असताना त्यांना एक बेवारस सायकल आढळून आली. ती सायकल उचलून त्यांनी पोलिस ठाण्यात आणली. ऐरवी बेवारस वाहने पोलिस ठाण्यात सडत असताना, या सायकलच्या चेसिस नंबरवरून भोसले यांनी स्टॉकिस्ट शोधला. त्यात शहरातील विक्रेता, विक्रेत्याकडेच चेसिस नंबरवरून बिल-चेकच्या नंबरवरून खरा मालक शोधत एका मेडिकल दुकानदाराला परत देण्यात आली.
अनपेक्षित प्रकार, त्यात चोरीला गेलेली नवी सायकल घेऊनच पोलिस धडकल्याने मालू कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी पोलिसांचे आभार मानले.