जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जुलै २०२१ । देशभरासह राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपासून सर्व सार्वजनिक उत्सव, कार्यक्रम आणि सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले आहेत. राज्यात कोरोना बराच नियंत्रणात आला आहे. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कोरोनाची स्थिती मोठ्या प्रमाणात सुधारली आहे. परंतु धोका अद्यापही कायम आहे. येत्या 21 जुलै रोजी ‘बकरी ईद’चा सण साजरा केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.

या आहेत मार्गदर्शक सूचना?
1. कोरोनामुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा इदगाह किंवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता नागरिकांना आपल्या घरीच नमाज पठण करावं.
2. जनावरांचे बाजार बंद असल्याने नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने किंवा मोबाईलच्या माध्यमातून कॉल करुन जनावरे खरेदी करावीत.
3. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.
4. सध्या लागू असलेल्या निर्बंधामध्ये बकरी ईद निमित्ताने कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाही.
5. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये.
6. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष ईदच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे.