मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी ! घरपोच मद्य विक्रीबाबत राज्य सरकारने घेतला हा निर्णय
जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२२ । कोरोना लॉकडाऊन काळात राज्य सरकारने (State Government) मद्य (Alcohol) व्यवसायाला दिलासा देण्यासाठी जे परवानाधारक मद्य विक्रेते आहेत, त्यांना घरपोहोच दारू विकण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र आता राज्य सरकारकडून घरपोच मद्य विक्री करण्याबाबतचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला त्याबाबत राज्य सरकारच्या वतीने आदेश देण्यात आला आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी देशासह राज्यावर कोरोनाचे संकट ओढवल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लावण्यात आले होते. लॉकडाऊन काळात सर्वच उद्योगधंदे आणि व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. लॉकडाऊनमुळे दारूची दुकाने देखील बंद होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्यानंतर लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवण्याचा निर्णय घेण्यात आला. दारू विक्रेत्यांना दारू विक्रीसाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र दारूच्या दुकानापुढे गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. दारू खरेदीसाठी मद्यपींनी रांगा लावल्या होत्या. गर्दी वाढल्याने कोरोनाचा धाका वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे राज्य सरकारने जे दारू विक्रेते अधिकृत परवानाधारक आहेत, त्यांना घरपोहोच दारू विक्री करण्याची परवानगी दिली होती.
मात्र आता कोरोनाचे संकट टळले आहे. तसेच सर्व निर्बंध देखील हटवण्यात आले आहेत. सर्व व्यवसाय पूर्वीप्रमाणे सुरू झाल्याने, राज्य सरकारने घरपोच मद्यविक्रीचा निर्णय मागे घेतला आहे. त्याबाबत राज्य सरकारच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क विभागाला आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारने आता घरपोच दारू विक्रीचा निर्णय मागे घेतल्याने आता मद्यपींना घरोपोच दारू मिळणे इथनपुढे बंद होणार आहे.