स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारची नवीन योजना ; हमीशिवाय मिळेल 10 कोटीपर्यंतचे कर्ज
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२२ । भारतात स्टार्ट-अप (Start-Up) झपाट्याने वाढत आहे, सध्या भारत हा जगातील सर्वोच्च देशांपैकी एक आहे ज्यामध्ये 2022 मध्ये युनिकॉर्न स्टार्टअप्सची संख्या 100 ओलांडली आहे. दरम्यान, देशातील स्टार्टअप्ससाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने क्रेडिट गॅरंटी स्कीम (CGSS) योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे आता स्टार्टअपला एका निश्चित मर्यादेत कोणत्याही हमीशिवाय 10 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकणार आहे.
केंद्राच्या डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT) ने एक अधिसूचना जारी केली आहे. या नोटीसमध्ये माहिती देण्यात आली आहे की पात्र स्टार्टअपसाठी 6 ऑक्टोबर 2022 रोजी किंवा त्यानंतर मंजूर झालेले कर्ज या योजनेचा लाभ घेऊ शकतात. माहितीनुसार, प्रत्येक स्टार्टअपला जास्तीत जास्त 10 कोटी रुपयांच्या कर्जावर हमी मिळेल. या योजनेअंतर्गत, सरकार व्यावसायिक बँक, नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी किंवा पर्यायी गुंतवणूक निधीकडून कर्ज घेण्यासाठी हमी देईल.
80 टक्के कर्जाची हमी दिली जाईल
कर्ज घेणाऱ्या स्टार्टअप कंपन्यांना सरकार 10 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर दोन प्रकारची हमी देईल. पहिली हमी व्यवहार आधारित कव्हर असेल. या अंतर्गत बँका किंवा NBFC कंपन्या स्टार्टअप्सना कर्जाची हमी देतील. अशाप्रकारे, ज्या स्टार्टअपचे मूळ कर्ज 3 कोटी रुपयांपर्यंत आहे त्यांना 80 टक्क्यांपर्यंत व्यवहार आधारित कव्हर मिळेल. स्टार्टअपला 3 ते 5 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर 75 टक्के आणि 10 कोटी रुपयांच्या कर्जावर 65 टक्के हमी मिळेल.
क्रेडिट हमी योजना काय आहे
अधिसूचनेनुसार, पात्र स्टार्टअप्सना वित्तपुरवठा करण्यासाठी सदस्य संस्थांनी (MIs) दिलेल्या कर्जांना क्रेडिट हमी देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ‘स्टार्टअप्ससाठी क्रेडिट गॅरंटी स्कीम’ (CGSS) मंजूर केली आहे.” ही योजना स्टार्टअप्सना आवश्यक हमीशिवाय कर्ज देण्यास मदत करेल.