जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२४ । अगोदर शैक्षणिक साहित्याच्या किमती भरमसाठ वाढल्याने पालकांचे बजेट कोलमडले आहे. यातच आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदापासून इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा फीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
तब्बल १२ टक्क्यांनी परीक्षा फी वाढवण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. कागद महागल्यामुळे यंदापासून दहावी आणि बारावीच्या परीक्षांची फी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी ५० रुपये जास्त मोजावे लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा फीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत १२ टक्ंक्यानी वाढ केली आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्यामुळे कागदाच्या किमतीतही वाढ होत आहे. त्यामुळे परीक्षा फीमध्ये वाढ करण्यात आले असल्याचे शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितलं.
आता किती रुपये भरावे लागेल?
दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आधी ४२० रुपये फी भरावी लागत होती. आता त्यांनी या परीक्षेसाठी ४७० रुपये फी भरावी लागणार आहे. तर बारावीच्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत परीक्षा फी ४४० रुपये भरावी लागत होती. पण आता बारावीच्या विद्यार्थ्यांना ४९० रुपये परीक्षा फी भरावी लागणार आहे. म्हणजेच दहावी आणि बारावीच्या परीक्षा फीमध्ये ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान या शुल्कासह प्रशासकीय शुल्क, गुणपत्रिका शुल्क, प्रमाणपत्र शुल्क आणि प्रात्यक्षिक परीक्षा शुल्कातही वाढ करण्यात आली आहे.