⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | मेहरूण ट्रॅकवर जागोजागी गतीरोधक व सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे : महापौरांचे आयुक्तांना पत्र

मेहरूण ट्रॅकवर जागोजागी गतीरोधक व सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे : महापौरांचे आयुक्तांना पत्र

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२२ । मेहरूण तलाव ट्रॅकवर रविवारी तरुणांच्या मस्तीमुळे एका चिमुकल्याला जीव गमवावा लागला. मेहरूण तलाव एक पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येत असताना अशी दुर्दैवी घटना मनाला चटका लावून जाते. मेहरूण ट्रॅकवर नागरिकांच्या हितार्थ आणि टवाळखोरांना आळा घालण्यासाठी जागोजागी गतिरोधक आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, असे पत्र महापौर जयश्री महाजन यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.

महापौर जयश्री महाजन यांनी दिलेल्या पत्रात, जळगाव शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलाव परिसराचा विकास करणे सुरू आहे. तलावाच्या वैभवात भर टाकण्यासाठी गणेश घाट, पक्षी घर उभारणी, वृक्ष लागवड, एलईडी लाईट व्यवस्था, नवीन चौपाटी आणि रस्ता तयार करण्यात आला आहे. मेहरूण ट्रॅकवर दररोज शेकडो जळगावकर नागरिक, मुले, मुली, वृद्ध, महिला सकाळ, संध्याकाळ फिरायला येत असतात. तलावाच्या ट्रॅकवर रविवारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून एका ११ वर्षीय चिमुकल्याला जीव गमवावा लागला आहे. मेहरूण ट्रॅकवर होत असलेल्या वाहनांच्या रेसिंग प्रकारचा चिमुकला बळी ठरला.

कालच्या घटनेने समाजमन सुन्न झाले असून भरधाव वाहन चालकांना लगाम घालण्याची गरज आहे. मेहरूण ट्रॅकला लागून असलेल्या रस्त्यावर ३ ते ४ ठिकाणी गतीरोधक तयार करणे, वाहनांच्या गतीची मर्यादा निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच मेहरूण तलाव परिसरात बऱ्याचदा गैरकृत्य देखील होत असतात. विशेषतः रात्रीच्या वेळी टवाळखोरांचा मोठा उच्छाद असतो. तलाव परिसरात खून झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. परिसरात अनेक जळगावकर शहरवासियांची घरे असून टवाळखोरांचा त्यांना देखील त्रास असतो. एकंदरीत सर्व गंभीर विषय लक्षात घेता मेहरूण तलावाच्या सभोवताली मनपा प्रशासन, पोलीस दल, जिल्हा नियोजन समिती अथवा सामूहिक योगदानातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे.

पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून शक्य असल्यास त्याठिकाणी एक पोलीस चौकी देखील उभारण्यात यावी. नागरिकांच्या हितासाठी आणि भविष्यात अपघात, अनुचित प्रकार रोखण्यासाठी मनपा प्रशासनाच्या माध्यमातून योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.