⁠ 
सोमवार, जून 17, 2024

रक्षा खडसेंसाठी प्रितम मुंडेंची खास पोस्ट ; म्हणाल्या आजच्या स्वार्थी जगात…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२४ । बीडमधून २०१४ आणि २०१९ मध्ये सलग दोन वेळा विजयी झालेल्या भाजपच्या माजी खासदार प्रितम मुंडे यांनी यंदाची लोकसभा निवडणूक लढवली नाही. त्यामुळे त्या संसदेत जाऊ शकणार नाहीत. पण जिवाभावाची मैत्रिण रावेरच्या खासदार रक्षा खडसे केंद्रात मंत्री होताच प्रितम यांनी भावनिक पोस्ट शेअर केलीय.संसदेत दोघींनी 10 वर्षे एकत्र काम केलंय.

प्रितम मुंडे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सुंदर व्हि़डीओ शेअर केला आहे. यामध्ये दोघींचे फोटो पाहायला मिळत आहेत. आजच्या एवढ्या स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखीच आहे, असं प्रितम मुंडे म्हणाल्या आहेत. त्यांची ही पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे.

प्रितम मुंडे यांची पोस्ट जशीच्या तशी
10 वर्ष ही खूप काही देऊन गेली , बहुतेक चांगलंच. मंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर जल्लोष साजरा करण्यापेक्षा आपली मैत्रीण संसदेत नाही म्हणून गहिवरून येणारी तू ! रक्षा ;आजच्या एवढ्या स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखीच आहे.. पक्षातील निवडणूक निरीक्षकांना एकमेकांच्या शिफारसी करणाऱ्या, स्वतःच तिकीट जाहीर झालं की नाही यापेक्षा मैत्रिणीचं तर झालं न हे बघणाऱ्या, निकालाच्या दिवशी स्वतःचे उतार चढाव हाताळताना देखील एक नजर कायम दुसरीच्या निकालाकडे ठेवणाऱ्या. १० वर्ष सतत संसदेत शेजारी बसणाऱ्या, पक्षाच्या बैठकांना एकत्रच जाणाऱ्या, दिल्लीत एकाच मजल्यावर राहणाऱ्या, एकमेकींना राजकीय घटनांपासून कपड्यांच्या रंगसंगतींपर्यंत सल्ले देणाऱ्या आपण. संसदेतली विधेयकांची चर्चा करणाऱ्या आपण, अनेक देवदर्शनांना देखील एकत्रच गेलो!

१० वर्षातला प्रवास तुमच्या सगळ्यांच्याच सोबतीने खूप छान झाला, पण तुझं स्थान माझ्या आयुष्यात खास होत आणि नेहमी राहील. आजच्या या स्वार्थी जगात निस्वार्थ मैत्री जपणारी माझी मैत्रीण रक्षा तुला या यशाच्या कोटी कोटी शुभेच्छा आणि तुझ्या हातून आजपर्यंत घडलं तसंच चांगलं कार्य घडो, सतत लोकसेवा तुझ्या हातून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!