जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरात गेल्या पाच दिवसापासून जळगाव जिल्हा दूध संघाच्या गुन्ह्याचे राजकारण मोठे तापले आहे. अपहार की चोरी या मुद्द्यावरून रणकंदन उठले आहे. माजी मंत्री आ.एकनाथराव खडसेंनी तर जाहीर पत्रकार परिषद घेत जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले. पोलिसांवर केलेले आरोप स्थानिक पातळीवर खरे असल्याचे भासू लागले आहे. स्थानिक पोलिसांना सध्या सर्वसामान्यांच्या चिंतेपेक्षा चोर, उचक्के, लफंगे आणि अवैध धंद्यावाल्यांचीच जास्त काळजी असल्याचे काही उदाहरणावरून दिसून येते. SP sir, is Eknathrao Khadse’s allegation true?
जळगाव जिल्हा दूध संघात झालेल्या अपहार, चोरीचा गुन्हा दाखल करण्यावरून सध्या मोठे वादळ उठले आहे. भाजप, महाआघाडीच्या नेत्यांच्या वादात पोलिसांची मात्र खिचडी होत आहे. पोलिसांना अनेक आरोप सहन करावे लागत असून पोलिसांची प्रतिमा मलिन होत आहे. अवैध धंदे आणि पोलिसांचे कनेक्शन काही लपून राहिलेले नाही. कोणताही अवैध धंदा असो त्याचे कनेक्शन थेट पोलिसांशी जोडले जाते. काही दिवसांपूर्वी महापौर जयश्री महाजन यांनी तर शनिवारी माजी मंत्री आ.एकनाथराव खडसेंनी पोलिसांवर अनेक आरोप केले.
पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी चांगले काम करीत असतील तरी स्थानिक पोलिसांकडून मात्र अनेकदा सर्वसामान्यांना बगल देण्यात येते. पोलीस प्रशासन अवैध धंद्यांवरून नेहमीच टार्गेट केले जाते. नुकतेच एक यादी व्हायरल होत असून त्यात हवाला आणि अवैध धंद्याच्या कलेक्शनचे आकडे देण्यात आले आहेत. यादीची सत्यता कितपत आहे हा नंतरचा भाग असला तरी त्यात पोलिसांची प्रतिमा मलीन होत आहे. स्थानिक पोलिसांकडून सर्वसामान्यांच्या तक्रारीला कशी बगल देण्यात येते याची काही ताजी उदाहरणे देखील आहे.
हुक्का मार : नियंत्रण कक्ष अधिकारी सांगतात, एलसीबीत तक्रार नोंदवा
जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या गोलाणी मार्केट समोर दि.२४ सप्टेंबर रोजी भर रस्त्यावर सायंकाळी ५.३० च्या सुमारास दोन व्यक्ती रिक्षात बसून खुलेआम गांजा सेवन करीत होते. रस्त्यावर ये-जा करणाऱ्या प्रत्येकाला गांजाच्या तीव्र गंधाचा त्रास सहन करावा लागत होता. शहर पोलीस ठाण्याशी याबाबत संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. नियंत्रण कक्षात तक्रार नोंदविण्यासाठी ६ वाजता संपर्क केला असता अधिकाऱ्याने अजब उत्तर दिले. शहर पोलिसात जा, फोन लागत नसेल तर मग एलसीबी कार्यालयात तक्रार नोंदवा. अखेर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांनी स्थानिक पोलिसांना त्याठिकाणी पाठवले. पोलिसांनक गांजा पिणाऱ्यांवर काय कारवाई केली हे मात्र समोर आलेच नाही.
तणाव : मध्यरात्री पोलीस अधीक्षक झाले अलर्ट
काही महिन्यांपूर्वी कंजरवाड्याजवळ दोन गटात वाद झाला होता. दोन गटातील सर्व संशयीत सध्या कारागृहातून बाहेर पडले असून खुन्नसबाजी सुरूच आहे. पुन्हा कधीतरी बदला घेऊ अशी वाट पाहिली जात आहे. एमआयडीसी पोलिसांना देखील याची कल्पना आहे. नवरात्री दरम्यान दि.६ रोजी मध्यरात्री १.४० च्या सुमारास काही तरुण हत्यार घेऊन सम्राट कॉलनीच्या रस्त्यावर उभे असल्याची माहिती मिळाली. एमआयडीसी पोलिसांना संपर्क केला असता फोन व्यस्त होता. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी लागलीच यंत्रणा कामाला लावली आणि पोलीस बंदोबस्त पाठवला. पोलिसांचे वाहन रात्रभर त्याठिकाणी थांबून होते. इतका मोठा प्रकार होत असताना पोलीस अनभिज्ञ कसे असा प्रश्न उपस्थित होतो.
मद्यपी आला शिव्या देऊन गेला पण पोलीस मात्र साखरझोपेत
जळगाव शहरात शनिपेठ परिसरात शनिमंदिर समोरील गल्लीत दि.१६ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास दोन तरुण मद्यपी आले. एक तरुण दारूच्या नशेत तरर होऊन गल्लीवाल्यांना विनाकारण मोठमोठ्याने शिव्यांची लाखोली वाहत होता. १५ मिनिटांपासून सुरू असलेल्या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांना देखील जाग आली. शनिपेठ पोलिसांना याबाबत रात्री १.१३ ला संपर्क केला असता त्यांनी गाडी पाठवतो असे सांगितले. ५ मिनिटांनी पुन्हा संपर्क केला असता पुन्हा तेच उत्तर ठाणे अंमलदाराने दिले. याचाच अर्थ तोवर त्या अंमलदाराने गस्ती पथकाला कळवलेच नव्हते. वाहनावर कोण आहेत असे विचारले असता नंदकिशोर पाटील आणि चालक इद्रिस पठाण असल्याचे त्यांनी सांगितले. दोघांचे संपर्क क्रमांक मागितले असता ते त्यांनी न देता मी कळवतो असे उत्तर दिले. पोलिसांची नागरिकांनी अर्धा तास वाट पाहिली मात्र पोलीसदादा काही आलेच नाही. मद्यपी देखील नागरिकांच्या इज्जतीची लख्तरे वेशीवर टांगत फुल्ल जोशात निघून गेला. रात्री घडलेल्या प्रकाराला आता जवळपास 12 तास उलटले आहेत. शनिपेठ पोलीस मद्यपीला शोधणार की पोलीस अधीक्षक कर्तव्यात कसूर केला म्हणून कर्मचाऱ्यांना जाब विचारणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
नेहमी वरीष्ठ अधिकारीच का?
जळगाव शहरातील तीन उदाहरणावरून एक गोष्ट तर लक्षात येते की स्थानिक पोलीस ठाण्याचे कर्मचारी सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही. लहानसहान किरकोळ तक्रारीसाठी रात्री अपरात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे कितपत योग्य आहे. पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक आणि स्थानिक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक सार्वजनिक ठिकाणी फलक करून लावले तर नागरिक किरकोळ कारणावरून देखील त्यांना संपर्क करतील. स्थानिक पोलीस कर्मचारी अवैध धंदेवाल्यांशी गप्पा करीत किंवा अवैध धंद्याजवळ उभे असल्याचे अनेकदा पाहण्यात आले आहेत. जर जनतेचे रक्षकच अवैध धंद्याच्या रक्षणार्थ किल्ला लढवणार असतील तर सर्वसामान्य मदतीच्या प्रतीक्षेत मरणारच आहे.